शेतकऱ्यांना घोषित केलेल्या १० हजार रूपयांबाबत मुख्यमंत्री मात्र ठाम

राज्यातील सुमारे ३१ लाखाहून अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांना नियमांचा अपवाद करुन १० हजार रुपये अग्रीम पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यास बँकांनी आक्षेप घेतला आहे. पण या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिला असून बँका हे अग्रीम कर्ज देण्यास तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केला.

सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा बँकांच्या उच्चपदस्थांची बैठक आयोजित केली होती. कर्जमाफीचे निकष तयार होण्यास वेळ लागणार असून अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. थकबाकीदार शेतकऱ्यांना नियमानुसार नवीन कर्ज देता येत नाही. त्यामुळे ३१ लाखाहून अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर ३० जून २०१६ नंतर कर्ज घेतलेल्या व त्याची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांनाही पुढील खरीप हंगामासाठी कर्ज मिळू शकणार नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम पीक कर्ज म्हणून बँकांनी उपलब्ध करुन द्यावे आणि कर्जमाफीची प्रक्रिया झाल्यावर नियमित पीक कर्जामध्ये ते रुपांतरित करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकांना दिला आहे.

पण थकबाकीदार कर्जदारांना एखाद्या राज्यात नियमांचा अपवाद करुन नवीन कर्ज देण्यास बँकांनी विरोध केला. शेतकऱ्यांनी १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज न फेडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा बँकांपुढे पेच आहे. अनेक बँकांकडे निधीची चणचण असून सहकारी बँकांची अवस्थाही वाईट आहे. त्यावर राज्य सरकारने ३० जून २०१६ पर्यंतची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निकष ठरविण्यास व प्रक्रिया करण्यास वेळ लागेल. त्यामुळे बँकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम पीक कर्ज उपलब्ध करुन द्यायचे आहे, त्याची हमी सरकार घेईल, असेही फडणवीस यांनी बँकांच्या उच्चपदस्थांना सांगितले. ही बैठक सकारात्मक पार पडली असून बँका ही रक्कम उपलब्ध करुन देतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना, कशा पध्दतीने उपलब्ध करावी, याचा तपशील अर्थ विभागाचे अधिकारी व बँकांच्या अधिकाऱ्यांकडून ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे अग्रीम रक्कम तातडीने दिली जाईल, असे सहकार मंत्र्यांनी जाहीर केले असले तरी त्यालाही काही दिवस लागणार आहेत.