मुंबईच्या धारावी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर मुंबई पोलिसांनी तबलिगींविरोधात अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. धारावीमधील एका व्यक्तीने आपल्यावर तबलिगी जमातच्या सदस्यांकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा केला आहे. डॉ बालिगा नगर परिसरात आपल्यावर हा हल्ला करण्यात आला असं त्याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर तबलिगी जमातचे सदस्य आपल्यावर थुंकले असाही दावा त्याने केला आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडीओत ही व्यक्ती धारावीत करोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूचा तबलिगी जमातशी संबंध असल्याची माहिती सर्वात प्रथम आपणच प्रशासनाला दिली असल्याचा दावा करत आहे. मात्र पोलिस तपासात हा व्यक्ती अफवा पसरवत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे शाहूनगर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉ. बालिगा नगर परिसरात वाद झाल्याची कबुली दिली आहे. पण ही व्यक्ती तबलिगी जमातच्या नावाचा वापर करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

दिल्लीत काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात देशभरातील अनेक मुस्लिम नागरिक हजर राहिले होते. या कार्यक्रमाद्वारे विविध शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान भारतासह जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. भारतातही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेलं असलं तरीही काही भागात लोकं नियम मोडून रस्त्यावर येत असताना दिसत आहेत. दरम्यान या विषाणूवर अद्याप ठोस औषध मिळालेलं नाही, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण कधी मिळवलं जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे.