दादर पूर्वकडील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना’च्या इमारतीचा ७० टक्के भाग शुक्रवारी रात्री अडीच्या सुमारास बुलडोझर चालवून पाडण्यात आला. त्यामुळे ‘दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’चे सदस्य आणि आंबेडकर कुटुंबियांतील वाद अधिक तीव्र झाला. केवळ दादागिरीच्या जोरावर रात्री उशिरा आंबेडकर भवनाची इमारत पाडण्यात आल्याचा आरोप करत आंबेडकर कुटुंबियांनी ट्रस्टच्या विरोधात शेकडो समर्थकांसह निषेध केला. तर दुसरीकडे पालिकेने इमारत धोकादायक बनल्याची नोटीस बजावल्याने ती पाडल्याचा दावा ट्रस्टने केला.

समाजातील वंचित, मागासवर्गीय आणि दलित घटकांची परिस्थिती सुधारावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीसच्या दशकात दादर पूर्वकडील जमिनीची खरेदी करून ‘दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ची स्थापना केली. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी छापखाना (प्रिटिंग प्रेस) व आंबेडकर भवनाची वास्तू उभारली. मात्र सध्या ही इमारत जिर्ण झाल्याने महापालिकेने ट्रस्टला १ जून रोजी नोटीस पाठवली असून त्याच्या आधारे ३० दिवसांच्या आत धोकादायक बांधकाम पाडण्याची जबाबदारी ट्रस्टवर असल्याने ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी या इमारतीचा काही भाग पाडला होता. त्यामुळे शुक्रवारी रात्री या इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यात आला. दिवस या भागात नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे दिवसा मोठी मशीन आणून इमारत पाडणे गैरसोयीचे झाले असते, असे ‘दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’च्या विश्वस्तांपैकी एक मधूकर कांबळे यांनी सांगितले.

‘आंबेडकर भवन’ पाडून त्या जागी १७ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीमधील जागा व्यावसायिकांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप आहे.

या विरोधात ट्रस्टचे विश्वस्त रत्नाकर गायकवाड, श्रीकांत गवारे, योगेश व्हरांडे, नागसेन सोनारे, अभय बांबोले, बोधवडे यांच्यासह ४०० ते ५००  व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.त्यांच्यावर कारवाई न झाल्यास याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा ‘भरिप बहुजन महासंघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

सात कोटींच्या निधीची घोषणा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आयोजित एका कार्यक्रमात डॉ. आंबेडकर भवनाच्या जागी उत्तुंग इमारत बांधण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखविला होता. या इमारतीसाठी राज्य सरकारकडून सात कोटी रुपये निधी देण्याची घोषणाही करण्यात आली.