मुंबई : ‘मुंबई मराठी साहित्य संघा’चे अध्वर्यू डॉ. राजाराम ऊर्फ बाळ भालेराव यांचे शुक्रवारी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या महिन्याभरापासून हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. दुपारी ४ वाजता दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी डॉ. अश्विनी भालेराव, मुलगा अभय भालेराव आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. बाळ भालेराव यांनी गेले अर्धशतक मुंबई मराठी साहित्य संघाची धुरा सांभाळली आणि तेथील नाटय़शाखा देश-विदेशात नावारूपाला आणली.

डॉ. भालेराव यांनी शालेय जीवनातच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यांनी एमबीबीएसमध्ये सुवर्णपदकही मिळवले होते. काही काळ केईएम रुग्णालयात शल्यविशारद म्हणून कार्य केल्यानंतर ते इंग्लंडला गेले. एफआरसीएसचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. मायदेशी परतल्यानंतर ते साहित्य संघात कार्यरत झाले. नाटय़शाखेतील कलाकारांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ते केव्हाही उपलब्ध असत. साहित्य संघाचे कार्यवाह म्हणून विद्यापीठाच्या नाटय़ शिक्षण समिती, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व नाटय़ विषयांच्या समित्यांवरही ते कार्यरत असत. पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. भालेराव यांनी भूषवले होते. जुनी, विस्मरणात गेलेली नाटके नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे वडिलांचे कार्य त्यांनी पुढे सुरू ठेवले.