राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांना ५ जुलै रोजी म्हणजेच येत्या सोमवारी ED च्या कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी दोन वेळा अनिल देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचं ईडीला कळवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं असून यंदा त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आलं असून त्यांना अनिल देशमुखांनंतर म्हणजेच ६ जुलै रोजी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, त्यानंतर आता ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी सुरू केली आहे.

 

याआधी देखील ईडीनं अनिल देशमुख यांना दोन वेळा चौकशीचे समन्स बजावले होते. दुसऱ्या समन्सवेळी मंगळवारी “कोणत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे? प्रकरण नेमके  काय आहे? नेमकी कोणती कागदपत्रे हवी आहेत? हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर तपास प्रक्रियेस सहकार्य करणे शक्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचलनालयाला(ईडी) पत्राद्वारे कळविली होती. त्याआधी पहिल्या समन्सवेळी देखील अनिल देशमुख यांनी चौकशीस हजर राहू शकणार नसल्याचं ईडीला कळवलं होतं.

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “मुंबईतल्या हॉटेल, बार, पब, रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दिलं होतं”, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्रात केला होता. त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांची ईडीनं चौकशी सुरू केली आहे. त्यासंदर्भात ईडीनं अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येत आहेत.