अहवाल, अभियानांच्या जंजाळात मतदारयाद्या अद्ययावतीकरणाची भर; शिक्षक संघटना विरोधाच्या पवित्र्यात

वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याचे मुख्य काम शांतचित्ताने करण्याऐवजी सतत विविध अहवाल, अभियाने राबवण्याच्या व्यापात अडकलेल्या शिक्षकांना आता मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या कामासाठी बोलावण्यात आले आहे. चाळीसहून अधिक नोंदवह्य़ा, वीसहून अधिक अहवाल, माध्यान्ह भोजन शिजवणे, गावांतील शौचालय मोजणे या कामांत शिकवणे हरवून बसलेल्या शिक्षकांना मतदारांचा अचूक तपशील जमविण्यासाठी गुंतविण्यात येणार असल्याने शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत असतील की वर्गाबाहेरच इतर कामांत त्यांचा दिवस संपेल, असा मोठ्ठा प्रश्न  शिक्षणवर्तुळात निर्माण झाला आहे. यामुळे शिकवण्याव्यतिरिक्तच्या कामांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम शिक्षक संघटनांनी सुरू केली असून आता मतदारयाद्यांच्या नूतनीकरणाचे काम करण्याला शिक्षकांकडून विरोध करण्यात येत आहे.

शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कामे लावण्यावर न्यायालयाने यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांना देता येतात. मात्र वेगवेगळे अहवाल देऊन आणि अभियाने राबवून वैतागलेल्या शिक्षकांकडून निवडणुकीच्या कामाला विरोध करण्यात येत आहे.

शिक्षणेतर व्याप

माध्यान्ह भोजनाचा अहवाल, सहशालेय उपक्रम, शैक्षणिक सहली, विशेष दिवसांसाठी राबवण्यात येणारी अभियाने, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रम आणि स्पर्धाचे अहवाल, वर्गातील पायाभूत सुविधांच्या स्थितीचे अहवाल, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल, लोहयुक्त गोळी देणे, जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल, डिजिटल शाळा, लोकसहभाग, मीना राजू मंच, विमा योजना, उपस्थिती भत्ता, गावातील शौचालयांची मोजणी, यांसारखे जवळपास २५ अहवाल देतानाच शिक्षकांना वर्गाबाहेर रहावे लागते.

शिक्षकांवरचे ओझे

  • शिक्षण विभागाच्या विविध अभियानांबरोबरच शासकीय शाळेतील शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील अभियानेही राबवावी लागत आहेत. शिक्षकांना सध्या चाळीसहून अधिक नोंदवह्य़ा ठेवाव्या लागतात.
  • हजेरी पुस्तकापासून ते विविध शिष्यवृत्त्या, विद्यार्थ्यांचे बस पास, खर्चाचे तपशील, पालक भेटी नोंदवाव्या लागतात. १९ शिष्यवृत्ती योजनांचे अहवाल पाठवावे लागतात.
  • अनेक शासकीय शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारीच नाहीत, तर अनुदानित शाळांमध्येही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही सगळी कामे शिक्षकांनाच करावी लागत आहेत.

अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा?

शिक्षण विभागाचे विविध अहवाल आणि अभियानांवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी उचलले असतानाच आता मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या कामाला रुजू होण्याचे आदेश शिक्षकांना आले आहेत. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या सत्राचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

दहावीच्या वर्गावरील शिक्षकही अडकले

दहावीच्या जवळ आलेल्या परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि  सराव परीक्षा घेण्याची शिक्षकांची गडबड सुरू आहे. मात्र, दहावीच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांनाही मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम लावण्यात आले आहे.  त्यांना ही  कामे लावू नयेत,’  अशी मागणी राज्य शिक्षक  परिषदेचे मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

Story img Loader