राज्यातील एक मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघात राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत फक्त एकाच घराण्याचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले असून, या मतदारसंघाने राज्याला दोन मुख्यमंत्रीही दिले.
एकाच घराण्याचे पहिल्या निवडणुकीपासून वर्चस्व असलेला पुसद हा मतदारसंघ आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने दिले. १९६२ ते १९७७ या काळात वसंतरावांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७७ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. यानंतर १९७८ पासून १९९५ पर्यंत वसंतरावांचे पुतणे सुधाकराव नाईक यांनी प्रतिनिधित्व केले. मुंबईतील जातीय दंगलीनंतर सुधाकररावांचे मुख्यमंत्री पद गेले आणि त्यांची नियुक्ती हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी झाली होती. १९९५ मध्ये सुधाकररावांचे बंधू मनोहरराव नाईक हे निवडून आले. १९९९ मध्ये पुन्हा सुधाकरराव हे या मतदारसंघातून निवडून आले. २००१ मध्ये सुधाकररावांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मनोहराव नाईक हे निवडून आले होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मनोहरराव नाईक हे निवडून आले. आघाडी सरकारमध्ये मनोहररावांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्रिपद भूषविले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोहररावांचे पुत्र इंद्रनील नाईक हे विजयी झाले. या वेळी नाईक घराण्यातील दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. मनोहररावांचे पुतणे व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नीलय नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गेल्या वर्षी त्यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली. या वेळी इंद्रनील आणि नीलय दोन चुलत भावडांमध्ये लढत होऊन राष्ट्रवादीच्या इंद्रनील यांनी बाजी मारली. राज्याच्या स्थापनेपूर्वी पुसद हा मतदारसंघ
मध्य प्रांतात असतानाही नाईक घराण्यानेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.