कुलाबा-सिप्झ मेट्रोच्या मार्गाचे ४५ टक्के काम पूर्ण; बीकेसी ते आरे वसाहतीदरम्यान पहिली धाव

विशेष प्रतिनिधी, मुंबई</strong>

सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि ३३.५ किमी लांबीच्या देशातील पहिल्याच अशा कुलाबा- सिप्झ भुयारी मेट्रोचा २४ किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झाला असून डिसेंबर २०२१ मध्ये वांद्रे- कुर्ला संकुल (बीकेसी) ते आरे वसाहतदरम्यान पहिली मेट्रो धावू लागेल, अशी माहिती ‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन’च्या (एमएमआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प दृष्टिपथात याव्यात, यासाठी या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजकि बांधकाम विभागासह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिडको या पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या सध्या कामाला लावण्यात आले आहे. नागपूरप्रमाणेच मुंबई, नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्प निवडणुकीपूर्वी कार्यान्वित व्हावेत, किमान दृष्टिपथात तरी यावेत यासाठी संबंधित यंत्रणांना कामाला लागल्या असून कामाचे वेग वाढविण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने दिसालादायक ठरणारा सर्वात महत्त्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलाबा- सिप्झ भुयारी मेट्रो मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे.

३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गात दोन मार्गिका असून आतापर्यंत सुमारे ४५ टक्के म्हणजेच २४.५ किलोमीटर लांबीच्या भुयाराचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये कफ परेड ते हुतात्मा चौकदरम्यान दोन किमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ग्रँट रोड दरम्यानच्या सात किमीपैकी साडेचार किमी लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सिद्धिविनायक मंदिर दादर ते शितळादेवी मंदिर माहीम दरम्यान १०किमी पैकी ६ किलोमीटर, धारावी ते सांताक्रूझ दरम्यानच्या ७ किमी पैकी ४ किलो मीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण मार्गाचे काम साधारणपणे मे २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे एमएमआरसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या मार्गावर एकूण २६ भूमिगत स्थानक असून त्यांचीही कामे प्रगतिपथावर आहेत. या २६पैकी १२ स्थानकांमध्ये खोदकाम पूर्ण झाले असून स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. तर १२ स्थानकांमध्ये अद्यापही खोदकाम प्रगतिपथावर आहे. पुढील दोन महिन्यांत तेथेही स्थानक उभारणीचे काम सुरू होईल. मात्र गिरगाव आणि काळबादेवी येथे जागा उशिरा उपलब्ध झाल्याने तिथे सध्या पायलिंगची कामे चालू असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

या प्रकल्पातील पहिल्या टप्याच्या आरे वसाहत ते बीकेसी दरम्यानच्या १२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर २०२१पर्यंत हा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाईल. तर बीकेसी ते कफ परेड दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तथापि, अजूनही आरेमध्ये कारडेपोसाठी झाडे तोडण्याची परवानगी वृक्षप्राधिकरणाकडून मिळालेली नसल्याने काम लांबू शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दुमजली स्थानके

सर्वधारणपणे मेट्रो स्थानकांची लांबी २५० मीटर, रुंदी २४ मीटर आणि खोली २५ मीटर आहे. मेट्रो ट्रेन वळवण्याची सोय असलेल्या बीकेसी आणि कफ परेड स्थानकांची लांबी मात्र ४५० मीटपर्यंत आहे. सर्व स्थानके दोन मजली असून साधारणपणे तळाला फ्लॅटफॉर्म आणि वरच्या मजल्यावर तिकीट घर व अन्य सुविधा त्याही जमिनीपासून सहा मीटर खाली असतील.