आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.

मुंबईतील विक्रोळी या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी राजा ढाले यांची प्राणज्योत आज पहाटेच्या सुमारास मालवली. बुधवारी दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेला असलेल्या त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र ते निवडून आले नाहीत. मराठीतल्या सत्यकथेची सत्यकथा त्यांनीच लिहिली. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही त्यांनी लिहिला होता.  त्यांच्या परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी ते प्रसिद्ध होते.

मला कोणत्याही जातीबाबत आकस नाही, जात मोडली पाहिजे. माणसाची उंची वाढली तर विचारांची उंची वाढेल. माणूस सुशिक्षित झाला असला तरीही सुसंस्कृत झाला नाही. सावित्रीबाई फुले यांनी जे महान कार्य केले त्यामुळे विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. हे खरे असले तरीही अन्यायाचे मूळ स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत गेले आहे. ही वृत्ती समूळ छाटली पाहिजे असे परखड विचारही त्यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात मांडले होते.

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.