मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करत केंद्र सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड आकारला आहे. नियमभंगासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वारेमाप असल्याने सध्या त्याविषयीच चर्चा सुरू आहे. पण, खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही एकदा वाहतूक नियमाचा भंग केला म्हणून दंड भरावा लागला होता. सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही आठवण सांगितली.

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने सोमवारी मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीवर बोलताना गडकरी म्हणाले, “मोटार वाहन कायद्यातील दुरूस्ती भेदभाव करणारी नाही. हा कायदा मंजूर करणे केंद्र सरकारसाठी मोठी कामगिरीच आहे. वाहतूक नियमांचा भंग केला म्हणून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढेल. भ्रष्टाचार होणार नाही”, असे गडकरी यांनी सांगितले. दंडाच्या रकमेविषयी बोलताना गडकरी यांनी स्वतः दंड भरल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, “वांद्रे-वरळी सी लिंकवरून वेगात गाडी चालवली म्हणून मी सुद्धा दंड भरला आहे. इतकेच काय तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जनरल व्ही. के. सिंग यांनाही वेगात गाडी चालवली म्हणून दंड भरावा लागला आहे”, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडल्याचे सांगत केंद्र सरकारने वाहतूक दंडांच्या रकमेत जबर वाढ केली आहे. कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसेल तर 100 रुपये दंड थेट 1000 रुपये करण्यात आला आहे. अतिवेगाने गाडी चालवली तर 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड करण्यात आला आहे, यासह इतर वाहतूक नियमाचा भंग केल्यास दंडाची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.