राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे. मागील १० दिवस ज्या बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली, त्या बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. पुणे आणि मुंबईत या मिरवणुकांना विशेष महत्त्व असून राज्यभरातील नागरिक बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन स्थळी गर्दी करत होते. पुण्यात मानाच्या पाच गणपतींनंतर इतर गणपतींचे विसर्जन केले जात आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास मंडई येथून निघालेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. तर मुंबईतही लालबागचा राजा, तेजुकायाचा गणपती, गणेशगल्लीचा राजा, परळचा राजा यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाल्याचे चित्र दिसत असून राज्यभरात या मिरवणुकांमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणयात आला.
निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी !
तब्बल दहा दिवस मनोभावे बाप्पांची पूजा केल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 23-09-2018 at 11:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati immersion 2018 ganeshotsav anant chaturdashi mumbai pune maharastra update
लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली होती. मात्र वेळीच सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान महिलेसह एका मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जन पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
डीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
लालबागचा राजा समुद्राच्या दिशेने रवाना झाला असून थोड्याच वेळात विसर्जन होईल.
पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकांची धामधूम रात्रभर सुरू होती. शहरातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री अलका चौकातून पुढे आली. पहाटे ५च्या सुमारास या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची मिरवणूक आता गिरगावात दाखल झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अजूनही उभे आहेत. जनसागराचा निरोप घेऊन जलसागरात विसर्जित होण्यासाठी आता लालबागचा राजादेखील सज्ज झाला असून 'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष चौपाटीवर सुरु आहे.
दिवसभराच्या मिरवणुकांनंतरही मंडळांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पुढे सरकल्यानंतर आता अखिल मंडई गणपती मंडळाची मिरवणूक अलका चौकात दाखल झाली आहे.
दिवसभर बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूक सुरु आहेत. तसे असले तरीही अजूनदेखील भक्तांचा आणि मंडळांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक अलका चौकात दाखल झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल.
बेलबाग चौकातील मुख्य मंदिरापासून दगडूशेठ गणपतीचे विसर्जनासाठी प्रस्थान झाले आहे. या गणपती मंडळाची मिरवणूक यंदा तीन तास लवकर निघाली असून पुण्यातील मिरवणूक यंदा लवकर संपेल असे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील एसपी कॉलेज परिसरात डीजे बंद करण्यावरुन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. तर खडकी भागात डीजे बंद करायला सांगितल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस नाईक थेटे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कार्यकर्त्यांनी शेटे यांच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत.
'परळचा राजा' विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल (छाया : दिलीप कागडा)
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. त्यानुसार, प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मध्यरात्रीनंतर २ वाजता बेलबाग चौकात येत असतो तो यंदा रात्री १० वाजता बेलबाग चौकात पोहचणार असल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक लवकर संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोर्टाचे आदेश धुडकावून पुण्यातील डेक्कन, कुमठेकर रस्ता, मंगळवार पेठ आणि दांडेकर पूल या भागात अनेक गणेश मंडळांनी डीजे वाजवण्याला प्राधान्य दिले. अशा प्रकारे कोर्टाचे आदेश धुडकावणाऱ्या या मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट शिवाजीनगर येथील मंडळाने टाळ वाजवून आणि साऊंडवर भक्तगीतं लावून निर्णयाचा निषेध नोंदवला. तसेच विश्रामबाग मित्र मंडळाकडून डीजे निर्णयाचा निषेध, भोंगे आणि थाळ्या वाजून निषेध करण्यात आला.
इंद्रायणी नदीत एका गणेश भक्ताचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. देहूगाव येथे दुपारी ही घटना घडली. संदीप साळुंखे असे या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विसर्जन करताना तो नदीत पडला. उपस्थितांना शोधण्यात अपयश आल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. तब्बल तीन तासांनी त्याचा शोध लागला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कोल्हापूरातील महाद्वार रोडवर गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे वृत्त आहे. मिरवणूक पुढे नेण्यावरुन पोलिस आणि कार्यकर्त्यांचा वाद झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतर मिरवणूक पुढे सुरळीत सुरु झाली.
पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा मानाचा तांडबी जोगेश्वरी, तिसरा मानाचा गुरुजी तालीम, चौथा मानाचा तुळशीबाग गणपती आणि पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीचे विसर्जन पार पडले आहे. त्यानंतर आता पुढील मिरवणुकीला सुरुवात झाली असून कुमठेकर रस्त्यावरील बहुतेक मंडळांनी कोर्टाचा आदेश झुगारुन डीजेला सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही मंडळांना डीजे लावल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत.
पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन.
मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल. जनसागराचा निरोप घेऊन बाप्पा निघाले गावाला...
मुंबईतील जुहू चौपाटीवर बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे. गिरगाव, दादर चौपाटीनंतर उपनगरातील अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं विसर्जन जुहू चौपाटीवर केलं जातं.
पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन
श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळातर्फे लालबागच्या राजावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. ( छाया सौजन्य : दिलीप कागडा)
नागपूर : दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागपूर येथेही घरगुती गणपतीच्या विसर्जनास सुरूवात झाली आहे. (छाया सौजन्य :मोनिका चतुर्वेदी)
दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावं यासाठी नाशिक इथल्या लेझिम अँड ढोल पथकातर्फे जनजागृती करण्यात आली. या पथकाद्वारे राबवण्यात आलेली मोहिम मिरवणुकीत अनेकांचं लक्ष वेधून घेत होती.
पुण्याचे ग्रामदैवत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल, गणपतीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश मुर्तीची स्थापना केली जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यावेळी कपूर कुटुंबातले सदस्य उपस्थित होते.
आर. के. स्टुडिओच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक, रणबीर कपूर आणि राजीव कपूर यांची मिरवणुकीला हजेरी
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी जमली आहे.
डीजेवर बंदी घातलेली असताना राज्यात अनेक मंडळांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवायला सुरुवात झाली आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी अलका टॉकीज चौकात भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. संस्कार भारतीची ही रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार रोखण्यायासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
मिरजेत मिरवणूक मार्गावर ११ स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कमानीवर आरक्षण मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशी दरम्यान होणाऱ्या ठाण्याच्या गणपती विसर्जनावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे , महिला लहान मुलं , तरुण मुली यांच्या छेडछाडी करणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलीस नजर ठेवणार आहेत. अतिसंवेदनशील परिसरात विसर्जन मिरवणुकीवर पहिल्यांदाच ड्रोनची नजर राहणार आहे