तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ निवासस्थानाच्या आसपास फेरीवाले डेरा टाकू लागले आहेत. हा परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ असतानाही घुसखोरी करणाऱ्या फेरीवाल्यांकडे पालिका आणि पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. अनेक वेळा पालिकेकडे तक्रार केल्यानंतर केवळ कारवाई करण्याचे आश्वासन देऊन वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्यामुळे आंबेडकरी जनतेचा भडका उडण्याची शक्यता आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे या वास्तूला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी करतात. या ऐतिहासिक वास्तूच्या आसपास कसलेही अतिक्रमण होऊ नये, आसपासच्या परिसरात पदपथावर फेरीवाल्यांचे कोंडाळे जमू नये म्हणून पालिका आणि पोलिसांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असे असतानाही पालिकेने ‘राजगृह’च्या आसपासचा परिसर ‘फेरीवाला क्षेत्रा’त समाविष्ट केला होता.
विधान परिषदेतही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ‘राजगृहा’ भोवतालचा अर्धा किलोमीटर परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. असे असतानाही गेल्या चार महिन्यांपासून ‘राजगृहा’च्या समोरच काही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. काहींनी तर पक्के बांधकामही केले आहे. ही बाब राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अनंत गाडगीळ आणि स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी पालिका उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेच्या विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी तर या फेरीवाल्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आजघडीला हळूहळू फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे.

..मात्र ‘राजगृहा’ विसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचे आयोजन करणाऱ्या राज्य सरकारला ‘राजगृह’चा विसर पडला आहे. सरकार, पालिका आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे ‘राजगृहा’ फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकण्याची भीती आहे.
अनंत गाडगीळ

Story img Loader