वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले होते. हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली. लॉकडाउनची मुदत आजच वाढवण्यात आली आहे. मात्र लोकांचा संयम सुटल्याचे यामध्ये दिसून आले. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून अधिकतर यूपी, बिहारचे होते. पोलिसांनी सध्या जमाव पांगवला आहे.

पोलिसांनी हा जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. ही घटना काही वेळापूर्वीच घडलेली असून आता पोलिसांनी वांद्रे येथील जमाव पांगवला आहे. या सगळ्या जमावामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार या ठिकाणी जमले होते. लांब पल्ल्याची गाडी सोडा अशी मागणी या सगळ्या कामगारांनी आणि मजूर वर्गाने केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हा सगळा जमाव पांगवला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांची समजूत काढली. वांद्रे पश्चिम या ठिकाणी ही घटना घडली. वांद्रे बेस्ट बस डेपोजवळ अनेक लहान मोठे कारखाने आणि फर्निचरची दुकानं आहेत. या दुकानांमध्ये काम करणारे मजूर आणि कामगार हे गावी जाण्यासाठी या ठिकाणी जमले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन

“मी सगळ्या कामगार आणि मजूर वर्गाला विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था यांची बंधनं पाळा. तुम्ही सध्या आहात तिथेच थांबा, तुम्हा सगळ्यांना निवारा आणि अन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही तुमचा संयम सोडू नका. तुम्हाला घरी जायचं आहे हे मी समजू शकतो. तूर्तास मुंबई सोडू नका” असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू हा करोनाची लागण झाल्याने झाला. अशा सगळ्या परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मागच्या शनिवारीच महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन कायम असेल असं सांगितलं. तसंच लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होतील असंही त्यांनी सांगितलं.

अखेर या सगळ्या गोष्टी सहन न झाल्याने गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशन बाहेर हजारोंच्या संख्येने कामगार वर्गाने गर्दी केली होती. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे ही मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी विशेष ट्रेन सोडा अशीही मागणी त्यांनी केली होती.