भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्यं प्रसाद लाड यांनी केल्याचं समोर आलं आहे. तर, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचे दिसत आहे.  आज भाजपाच्यावतीने माहीम विधानसभा कार्यलायच्या बाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

आमदार प्रसाद लाड म्हणाले की,  ”भाजपाची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू.”

तसेच, ”सकाळपासून मला पोलिसांचे फोन येत आहेत, आपण या कार्यक्रमाला जाऊ नका असं म्हणत होते. मी त्यांना म्हटलं आम्ही कार्यक्रमाला जातो, तुम्ही आम्हाला अटक करून दाखवा. कारण, आम्हाला अटक झाली की निश्चितच जिथं दगड पडायला पाहिजे तिथे पडतील. यापुढे दक्षिण मुंबईत कुठलाही मोर्चा असेल खास करून माहीमध्ये तेव्हा मला आणि नितेश राणे यांना बोलावयला विसरू नका. जसं नितेश राणेंनी तुम्हाला सांगितलं की आम्ही आलो की ते पळून जाणार, त्यामुळे तिथे दंगलच होणार नाही. कारण शिवसेनेच्या कुंडल्या कोणाच्या कुठे आहेत? आणि कुठली नाडी खेचली की कोण ओरडतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.” असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.