भाजपची मागणी; करोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत असतानाच, लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी ठाकरे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपालांकडे केली. त्यामुळे ठाकरे सरकारविरोधात भाजप अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असून, मृतांचा आकडाही वाढला. करोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपच्या वतीने सातत्याने करण्यात येतो. मुंबईचा कारभार लष्कराकडे सोपवावा, अशी मागणी काही भाजप नेत्यांनी केली होती. तसेच गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र बचाव आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले होते. राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले होते. यानंतर रेल्वे गाडय़ांचा मुद्दा किं वा विमानसेवा यावरून भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटल्याचे बघायला मिळाले.

या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सायंकाळी राजभवनवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मुंबई, पुणे, ठाण्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. अजूनही करोना नियंत्रणात आलेला नाही. लोकांचा नाहक बळी जात आहे. राज्य सरकार ही परिस्थिती हाताळण्यात संपूर्ण अपयशी ठरले आहे. लोकांचा जीव महत्वाचा आहे. यामुळेच राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्यपालांकडे के ल्याचे राणे यांनी सांगितले. परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री ठाकरे हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सरकारमध्ये काहीही ताळमेळ दिसत नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच पर्याय असल्याचे राणे यांचे म्हणणे आहे.

राज्यपाल – शरद पवार भेट

राज्यात दोन सत्ताकेंद्रे तयार होत असल्याची टिप्पणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांच्या  कार्यपद्धतीबद्दल तक्रोर करणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना राज्यपाल कोश्यारी यांनी भेटीसाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राजभवनवर जाऊन राज्यपालांशी चर्चा केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राणे यांनी केलेली मागणी व राज्यपालांनी पवारांना भेटीसाठी बोलाविल्याने केंद्राच्या मनात काही वेगळे घोळत असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. राज्याच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी भक्कम बहुमत आहे, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले.

Story img Loader