नमिता धुरी

यंत्रणा अद्ययावत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

तिकीट खिडक्यांवरचा ताण कमी व्हावा आणि प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेने ‘को-टीव्हीएम’ यंत्रांची सोय उपलब्ध करून दिली. मात्र या यंत्रांमध्ये १०, ५०, २०० रुपयांच्या नव्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने हे यंत्र प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.

को-टीव्हीएमच्या स्क्रीनवर सर्व रेल्वे मार्गाचा नकाशा दिलेला असतो. त्यातील हव्या त्या स्थानकावर क्लिक करून तिकीट काढता येते. त्यासाठी नोटा किंवा नाणी यंत्रामध्ये टाकावी लागतात. यात नाणी सर्व स्वीकारली जात असली तरी नव्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. आकाराने लहान असलेल्या नव्या नोटा यंत्रामध्ये जाताच परत बाहेर येतात. शिवाय येथे नव्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे नोट परत आल्यावर प्रवासी गोंधळात पडतात व तिकीट खिडकीवरच्या रांगेत उभे राहतात. प्रवाशाला १० रुपयांची तिकीट काढायची असल्यास तिकीट खिडकीवर २० रुपयांची नोट देऊन तिकीटासह उर्वरित १० रुपये परत मिळतात. मात्र को-टीव्हीएममध्ये ही सोय नाही. त्यामुळे सुट्टे पैसे भरण्याशिवाय पर्याय नसतो.

घाईच्या वेळी तिकीट खिडकीवरच्या लांबच लांब रांगेत उभे राहून प्रवाशांना तिकीट घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून एटीव्हीएम यंत्रांचा पर्याय आला. याद्वारे तिकीट काढण्यासाठी नियमित प्रवासी स्मार्ट कार्डचा वापर करतात. मात्र कधी तरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कार्ड नसल्याने त्यांना रांगेत उभे राहावे लागते. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने आपले काही कर्मचारी एटीव्हीएम यंत्रांजवळ नियुक्त केले. हे कर्मचारी प्रवाशांकडून रोख रक्कम घेऊन आपल्या कार्डने तिकीट काढून देतात. त्यामुळे एटीव्हीएम यंत्रांसमोर मोठी रांग पाहायला मिळते. मात्र एटीव्हीएमच्या बरोबरीने आलेले को-टीव्हीएम आजही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. देशात गेल्या वर्षी नोटाबंदी लागू झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यात नागरिकांना अनेक अडचणी जाणवत होत्या. त्याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता एटीएमप्रणाली अद्ययावत करण्यात आली. मात्र को-टीव्हीएम यंत्राबाबत रेल्वे प्रवासी आजही अनभिज्ञ आहेत. या यंत्रांचा फारसा वापर होत नसल्याने रेल्वेही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. परिणामी यातील यंत्रणा अद्ययावत झालेली नाही.

मुंबईत एकूण २० को-टीव्हीएम यंत्रे आहेत. त्यांतील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम्स’ काम करीत आहे. त्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल हे सांगता येणे कठीण आहे. मात्र तोपर्यंत एटीव्हीएमप्रमाणेच को-टीव्हीएम यंत्राजवळ रेल्वेचे कर्मचारी नियुक्त केले जातील. ते प्रवाशांकडून रोख रक्कम घेऊन स्वतच्या स्मार्ट कार्डने तिकीट काढून देतील.

-रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे