इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आणि २००८ मधील अहमदाबाद-सुरत बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपी अफझल उस्मानी (३२) शुक्रवारी न्यायालयातून पळून गेला. भर दिवसा उस्मानीने गुंगारा दिल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे. या प्रकरणी  दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवी मुंबईतून चोरीला गेलेल्या गाडय़ांचा तपास करताना त्यातील चार गाडय़ा अहमदाबाद व सुरत येथील स्फोटांसाठी वापरण्यात आल्याचे व त्यात उस्मानीचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. उस्मानीच्या अटकेनंतर या प्रकरणातील इतर आरोपींना पकडण्यात आले होते. शुक्रवारी उस्मानीसह इतरांवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. त्यासाठी त्यांना तळोजा कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले. दुपारी सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील कक्षाबाहेर सगळ्या आरोपींना बसविण्यात आले होते. जेवणाच्या सुट्टीत तिथे गर्दी असते. या गर्दीचाच फायदा उठवत उस्मानीने प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा केला व तेथूनच पोबारा केला. विशेष म्हणजे उस्मानी कधी पळाला हे पोलिसांनाही कळले नाही. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला.