शीना बोरा हत्याकांडप्रकरणी माजी चालक माफीचा साक्षीदार

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील कथित सूत्रधार आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी तसेच तिचे दोन्ही पती संजीव खन्ना व पीटर मुखर्जी यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. शीनाची हत्या करण्यासाठी इंद्राणीला मदत करणारा तिचाच माजी चालक श्यामवर राय याने आपल्याला या हत्याकांडाबाबत सगळे खरे सांगायचे आहे, असा दावा करत ‘माफीचा साक्षीदार’ बनण्याची व्यक्त केलेली इच्छा सोमवारी विशेष न्यायालयाने मान्य केली. शिवाय न्यायालयाने त्याला शिक्षेत माफीही दिली आहे.

हत्याकांडाचे सत्य उघड करण्यासाठी आपल्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही वा कुणी आपल्याला धमकावलेले नाही. उलट केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्यानेच आपण ‘माफीचा साक्षीदार’ बनून शीना हत्याकांडाचा कर्ताकरविता कोण, ते कसे घडले आणि गुन्’ााचे भागीदार कसे बनलो हे सांगण्यास तयार आहोत, असे राय याने न्यायालयाला सांगितले होते. शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदतही केली होती. एवढेच नव्हे, तर शीनाची गळा दाबून हत्या केल्याचेही त्याने ‘माफीचा साक्षीदार’ बनवण्याची विनंती करताना न्यायालयाला सांगितले होते. सीबीआयनेही त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी राय याची ‘माफीचा साक्षीदार’ बनण्याची मागणी मान्य केली. हत्याकांडाबाबतचे सगळे सत्य तुला सांगावे लागेल. नेमके काय घडले, तू काय केले, इतरा आरोपींनी नेमके काय केले? याचा सत्य तपशील द्यावा लागले, असे   न्यायालयाने सांगितले.त्यावर राय याच्याकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.

माफीचा साक्षीदार म्हणजे काय?

एखाद्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार नसलेला आणि गुन्हा कसा घडला याबाबत त्याला माहीत असलेले सत्य न्यायालयासमोर सांगण्यास तयार असलेल्या आरोपीला ‘माफीचा साक्षीदार’ बनवले जाऊ शकते. आरोपीने ‘माफीचा साक्षीदार’ बनण्याची इच्छा व्यक्त केली, तरी तपास यंत्रणेचे मत लक्षात घेऊन न्यायालय त्याबाबतचा निर्णय घेते. थेट पुरावे मिळण्याची कुठलीही शाश्वती नसताना आणि ‘माफीच्या साक्षीदार’ बनण्यासाठी तयार असलेल्या आरोपीचा जबाब न्याय देण्यास पुरेसा ठरू शकतो, अशाच वेळेस न्यायालया संबंधित आरोपीला ‘माफीचा साक्षीदार’ बनवते. त्याचा जबाब न्यायालयाकडून नोंदवला जाईपर्यंत तसेच सरकारी वकिलांनी त्याने दिलेला जबाब खरा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका होते. खटल्याच्या निकालाच्या वेळेस या ‘माफीच्या साक्षीदारा’ला कमी शिक्षा सुनावली जाते वा त्याची शिक्षा पूर्णपणे माफ केली जाते.