दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षेच्या गुणांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली सकारात्मक चर्चा झाली असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण मिळतील, असा निर्णय झाल्याचेही त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शुभेच्छांसाठी सर्वांचे आभारही मानले. दरम्यान, पत्रकारांशी त्यांची विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत बोलणे टाळले. मात्र, माझ्या हातून चांगले काम व्हावे, असेच आपण वागत असतो असे ते म्हणाले.

दुष्काळ आणि एसएससी या दोन मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी काल सकारात्मक बैठक झाल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘दुष्काळी भागात पीक विम्याच्या तांत्रिक गडबडींवर लक्ष देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रोजगार हमीच्या कामांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचे ते यावेळी म्हणाले. चर्चेदरम्यान, पाणीप्रश्नावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे अशी भुमिका आपण मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

त्याचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांचा तोंडी परीक्षेच्या गुणांचा प्रश्न प्राधान्यांने सोडवणे गरजेचे असून नापास विद्यार्थ्यांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली असून पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण मिळतील असे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अंतर्गत गुणांच्या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त यावर्षी महाविद्यालयांमध्ये विशेष तुकडी सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले.