उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझें यांचीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज (सोमवार) केली. मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंची एवढी वकिली का करत आहेत? असा सवालही नितेश राणे यांनी केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले की, अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील सापडलेल्या वाहनाचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यात एकट्या वाझेंचा सहभाग असेल असे वाटत नाही. यामागे बड्या व्यक्ती आणि शक्ती असाव्यात. याचा सूत्रधार कोण आहे हे राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोधून काढणे आवश्यक आहे. आयपीएल स्पर्धेवर बेटिंग लावणाऱ्या टोळीशी वाझे यांनी संपर्क साधला होता, यासंदर्भात वरुण सरदेसाई यांनी वाझे यांच्याशी संपर्क साधला. वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात दूरध्वनीवर झालेल्या संवादाची व्हाट्सअॅप सारख्या माध्यमातून चौकशी केल्यास अनेक रहस्ये बाहेर येतील.
There’s one Varun Sardesai who has got Y+ security from Maharashtra govt & is related to govt. He had contacted & his conversation is also there with Waze. He had said -‘why are you demanding this, what is our share?’ This angle should be investigated by NIA: Nitesh Rane,BJP(2/2) pic.twitter.com/4LdKb1mttb
— ANI (@ANI) March 15, 2021
ठाकरे सरकारने कोणत्याच घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली. शासकीय बैठकांनाही ते उपस्थित असतात. अनेक अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात अशा सरदेसाईंनी वाझे यांच्याशीकोणत्या कारणासाठी कितीवेळा संपर्क साधला याचीही चौकशी ‘एनआयए’ने करावी. असेही नितेश राणे म्हणाले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर निलंबित झालेल्या वाझेंना जूनमध्ये कोरोना काळात कमी मनुष्यबळाचे कारण देत पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना सेवेत पुन्हा घेण्याची शिफारस करणाऱ्या समितीत कोण-कोण होते याची माहिती जाहीर होणे आवश्यक आहे असे देखील आमदार राणे यांनी नमूद केले.