“मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी अनिल परब म्हणाले होते. परंतु आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा जबाबदार? हे त्यांनी सांगावं!” असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांना विचारला आहे.

मान्सूनने मुंबईत आज जोरदार हजेरी लावल्याने, मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईतील अनेक भागांमधील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरिपीट उडाली. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. तर, हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून राज्य सरकार तसेच मुंबई मनपावर जोरदार टीका केली जात आहे.

तर, “पुन्हा एकदा ‘मुंबईची तुंबई झाली’, मुंबईत पाणी भरवून दाखवलं! मागील वेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील भरणाऱ्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील असं सांगितलं होतं. आता त्यांनी सांगांवं मुंबईत तुंबलेल्या पाण्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री की मुंबई मनपा? या ठिकाणी पूर्णपणे नियोजनचं अपयश आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले नाही आणि आता समुद्राची भरती व मुसळधार पाऊस आला म्हणून पाणी तुंबलं असं सागत आहात. २०-२५ वर्षे समुद्राची भरती, मुसळधार पाऊस हा मुंबईला नवीन नाही. त्यामुळे आता मुंबईत तुंबलेल्या पाण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी आणि आता तरी तत्काळ कडक उपाययोजना करत, मुंबईत तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था उभी करावी व जनजीवन सुरळीत करावं.” असं देखील मुंबई मनपावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

“…पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला”

याशिवाय भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील मुंबईची तुंबई झाल्यावरून मुंबई मनपावर निशाणा साधलेला आहे. “पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.