जीटी रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया गृहात सकाळपासून अजित कुमारच्या तुटलेल्या हातावर शस्त्रक्रिया सुरु होती. अस्थिशल्यविषारदांनी तुटलेल्या हाताचे हाड जोडले… पाठोपाठ रक्तवाहिन्या जोडण्याचे काम सुरु झाले… हे एक आव्हान होत. सुघटन शल्यविशारदांनी ( प्लास्टिक सर्जन) ते लिलया पेलले… सुघटन शल्यविभागाच्या नेतृत्वाखाली तब्बल ११ तास अजितचा हात जोडण्याची शस्त्रक्रिया चालली होती… शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी खरी कसोटी त्यापुढेच होती… ती अवघड जबाबदारी पेलण्यासाठी त्याला तात्काळ जीटी रुग्णालयामधून पुन्हा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल ४० दिवसांच्या उपचारादरम्यान अजितला करोना झाला व त्यातूनही तो बरा झाला असून त्याचा तुटलेला हात आता पुन्हा पुर्ववत झाला आहे. करोना काळातील कदाचित ही देशातील एक आगळी शस्त्रक्रिया असल्याचे जे. जे. तील डॉक्टरांनी सांगितले.

भायखळा रेल्वे स्थानकात १६ मार्च रोजी कामावर जाण्यासाठी धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अजित कुमार फलाटावर पडला व त्याचा हात लोकलखाली आल्याने कोपराखाली संपूर्ण तुटला. त्याचा तुटलेला हात व अजितला घेऊन भायखळा रेल्वेतील कर्मचारी जे. जे. रुग्णालयाच्या अपघात विभागात पोहोचले तेव्हा सकाळचे सात वाजले होते. तेथे असलेल्या डॉक्टरांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखले तथापि शस्त्रक्रिया गृह दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे जीटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रणजित माणकेश्वर, अधिक्षक डॉ संजय सुरासे यांनी तात्काळ जीटी रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ भालचंद्र चिखलीकर यांना दूरध्वनी करून शस्त्रक्रिया गृह सज्ज ठेवण्यास सांगितले. थोड्याच वेळात सुघटन शल्यचिकित्सक, अस्थिशल्यचिकित्सक जीटी रुग्णालयात पोहोचले आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरु झाली. भूलतज्ज्ञ प्रमुख डॉ उशा बडोले यांनी भूल देण्याचे काम केले. त्यापाठोपाठ अस्थिशल्यचिकित्सकांनी तुटलेल्या हाताचे हाड जोडून दिले. त्याचवेळी रक्तवाहिन्या व मज्जारज्जू जोडण्याचे काम सुरु झाले. घटिकेमागून घटिका सरत होती. सुघटन शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ चंद्रकांत घारवाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ योगेश जयस्वाल व डॉ नितीन मोकल यांनी जोडलेल्या हाताला आकार देण्याचे काम हाती घेतले. पायातील नसा काढून तुटलेल्या हाताला जोडल्या गेल्या तसेच पोटावरील कातडी काढून तुटलेल्या हातावर पुन्हा आवरण चढविण्याचे जटिल काम सुघटन शल्यचिकित्सकांनी पूर्ण केले.

अकरा तासांनी शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पुढचे काम खूपच अवघड होते. त्याच रात्री उशीरा अजित कुमारला जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. हातामधील नसा योग्य प्रकारे जोडल्या गेल्या आहेत की नाही यावर फार बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते अन्यथा रुग्णाचा हात वाचणे कठीण होते. शस्त्रक्रियेनंतर जवळपास २१ दिवस डॉक्टर अहोरात्र त्याची काळजी घेत होते. दरम्यानच्या काळात अजितला करोना झाल्याचे चाचणीत आढळून आले आणि डॉक्टर हादरले. लागेलाग करोनावरील उपचारासाठी त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पाच दिवस डॉक्टरांनी काटेकोर काळजी घेतल्यानंतर करोनामुक्त झाल्याने पुन्हा त्याला जे. जे. रुग्णालयातील वॉर्ड ३६ मध्ये दाखल करण्यात आले. तीन एप्रिलपासून त्याच्यावर वॉर्डात रोज ड्रेसिंग केले जात आहे. आता त्याचा हात पुन्हा पूर्ववत झाला असून त्याला लवकरच घरी जाऊ दिले जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी काही छोट्या शस्त्रक्रियांसाठी त्याला रुग्णालयात यावे लागेल असे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत घारवाडे यांनी सांगितले.

Story img Loader