मजुरांऐवजी इतर नागरिकांचा प्रवास; अनेकजण प्रवासापासून वंचित

परराज्यातील गरीब मजुरांना आपल्या राज्यात सोडण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून मोफत ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या ट्रेनमधून मजुरांऐवजी स्थानिक नागरिक प्रवास करत असल्याने मजुरांना जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. मजुरांना प्रवासाची नेमकी प्रक्रिया शासनाकडून पोहोचवली जात नसल्याने त्यांच्या ऐवजी इतर नागरिक फायदा उचलत आहेत

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद अवस्थेत पडून राहिले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब आणि बेघर कामगारांकरिता महाराष्ट्र शासनाकडून मोफत श्रमिक ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु या रेल्वे सेवांचा अधिक फायदा गरीब मजदूर न उचलता शहरातील इतर नागरिक उचलत असल्याचे समोर आले आहे. कामगारांपर्यंत योग्य पद्धतीने माहिती पुरवली जात नसल्यामुळे त्यांना या सेवेचा फायदा होत नसल्याचे आरोप मजुरांकडून करण्यात येत आहेत.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाचा आकडा पाचशे पार झाला आहे. शहरात औद्योगिक वसाहती असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात परराज्यातील मजदूर या भागात आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातून करोनामुळे पायपीट करत असलेल्या मजुरांकरिता महाराष्ट्र शासनाकडून उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान अशा राज्यांत मोफत ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु या ट्रेनने अधिकांश शहरातील मध्यम वर्गातील नागरिक राजस्थान आणि बिहारच्या दिशेने जात आहेत.  तसेच मजुरांपर्यंत योग्य माहिती उपलब्ध करून दिली जात नसून स्थानीय लोकप्रतिनिधी आपल्याजवळील नागरिकांना ट्रेनने सोडत असल्याचे आरोप मजुरांनी केले आहेत.

स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांमध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेद करणे योग्य नाही. परंतु प्रशासनाकडून अधिकाधिक गरजू नागरिकांना परराज्यात सोडण्याकरिता काम करण्यात यावे.

– प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेते (विधान परिषद)

आम्ही कित्येक दिवस फक्त इथे-तिथे फेऱ्या मारत आहोत परंतु आम्हाला अजून जाण्याकरिता कोणतेही वाहन उपलब्ध झाले नाही. परंतु आमच्या ओळखीतले कित्येक बिगर मजूर नागरिक रेल्वेने गावी पोहोचलेसुद्धा.

– मजूर (आजमगड निवासी)

Story img Loader