कमला मिल कंपाऊंडमधील ‘वन अबव्ह’ या रुफटॉप पबमधील आगीत प्रीती राजगिरीया यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रीती (वय ४८) आणि त्यांची मुलगी रुची या दोघी डिनरसाठी तिथे गेल्या होत्या. आग लागल्यावर दोघी एकत्रच तिथून निघाल्या. मात्र, गर्दीत प्रीती मागे पडल्या आणि बाथरुममध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला.

प्रीती राजगिरीया आणि त्यांची मुलगी रुची या दोघी ‘वन अबव्ह’ येथे डिनरला गेल्या होत्या. प्रीती यांचे पती कामानिमित्त बडोदा येथे गेले होते. त्यामुळे मायलेकींनी रात्री जेवायला बाहेर जायचा बेत केला. रात्री उशिरा प्रीती यांचे पती घरी परतले. यानंतर त्यांचे मुलगी रुचीशी फोनवरुन बोलणेही झाले. ‘रेस्तराँमध्ये आग लागली असून थोड्या वेळात बोलते’ असे सांगत तिने फोन ठेवला. यानंतर रुची आणि प्रीती या दोघीही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. गर्दीत प्रीती यांनी मुलीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. मात्र, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रीती यांचा हात सुटला आणि रुची गर्दीतून पुढे गेली. रुची बाहेर पडण्यात यशस्वी ठरली. पण प्रीती यांना बाहेर पडताच आले नाही. त्या देखील बाथरुमच्या दिशेने गेल्या. बाथरुममध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. राजगिरीया कुटुंबात महिनाभरात हा दुसरा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रीती राजगिरीया यांच्या आईचा देखील मृत्यू झाला होता, असे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘वन अबव्ह’ या पबमध्ये सर्वप्रथम आग लागली. या आगीचे लोण लगतच्या मोजोस ब्रिस्ट्रो पबपर्यंत पोहोचले. या दोन्ही पबमध्ये इमर्जन्सी एक्झिट मार्गात सामान होते. त्यामुळे बाहेर पडताना अडथळे येत होते. या प्रकरणी ‘वन अबव्ह’चे मालक अभिजीत मानकर, हितेश सिंघवी आणि जितेश सिंघवी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि यात महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत का याची देखील चौकशी केली जाईल. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.