सुरुवातीलाच खिडकीवरील प्रवाशांना प्रतीक्षा यादीचे तिकीट
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांची आरक्षणे सुरू झाल्यानंतर लगेच या गाडय़ा तुडुंब झाल्या असून, पहिल्या दोन-तीन दिवसातच प्रतीक्षा ५००वर गेली आहे. तिकीट खिडकीवर रांगा लावणाऱ्या प्रवाशांना आतापासूनच प्रतीक्षा यादीची तिकिटे मिळण्यास सुरुवात झाली आहे. खिडकीवर पहिल्या क्रमांकावर उभे राहिलेल्या अनेक प्रवाशांना हा अनुभव आला असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्रवासाच्या १२० दिवस आगोदर रेल्वे आरक्षण करण्याच्या नियमामुळे ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षणे शुक्रवारपासून (६ मे) सुरुवात झाली. ३, ४, ५ सप्टेंबरच्या गाडय़ांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यराणी एक्स्प्रेस, कोकणकन्या, जनशताब्दी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर आणि मांडवी या गाडय़ांचे आरक्षण पूर्णझाले आहे. यात अनेक गाडय़ांची प्रतीक्षा यादी ३०० ते ३५०च्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर कोकणात दाखल होण्यासाठी ही घाई सुरू झाली असली, तरी उत्साहाने गेलेल्या प्रवाशांच्या हाती चक्क प्रतीक्षा यादीचे तिकीट पडू लागल्याने त्यांचा संताप वाढू लागला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातील प्रवाशांना सुरुवातीला काही तिकिटे मिळाली. मात्र त्यानंतर लगेच प्रतीक्षा यादी सुरू झाली. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडय़ा सोडण्यात येत असल्या तरी किमान नियमित गाडय़ांचे आरक्षण हाती असावे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयास विफल ठरू लागले आहेत. त्यामुळे हा प्रकार तिकीट एजंटांकडून होत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रेल्वे आरक्षण संकेतस्थळ आणि इतर माध्यमातून हे एजंट आरक्षण करत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
खिडकी उघडल्याक्षणी प्रतीक्षा यादी कसाऱ्यातील सुधीर राऊत ६ मे रोजी पहाटे आरक्षण केंद्रामध्ये दाखल झाले. पहिल्या क्रमांकावर असलेल्या राऊत यांना तिकीट उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती.
मात्र ८ वाजता तिकीट खिडकी उघडल्यानंतर राज्यराणी एक्स्प्रेसचे चिपळूणपर्यंतचे तिकीट मागितल्यानंतर त्यांना ५६ प्रतीक्षा यादी असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी ते काढण्यास सांगितल्यानंतर हा व्यवहार होईपर्यंत त्यांच्या हाती ५८ क्रमांकाचे तिकीट आले. हा प्रकार पाहून त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी संताप व्यक्त केला.
‘डबलडेकर’चे आरक्षणही फूल
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याची ओरड होत असलेल्या डबलडेकरलाही यंदा गणेशोत्सवानिमित्त चांगला प्रतिसाद मिळत आहे. २ सप्टेंबरला १३४ तर ४ सप्टेंबरला ३०१ आकडा प्रतीक्षा यादीवर झळकत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात डबलडेकर गाडीला अधिक डबे जोडले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Untitled-9