अतिरेकी हल्ला असो किंवा नैसर्गिक आपत्ती मुंबई पोलीस प्रत्येक वेळा आपल्या जीवाची बाजी लावत शहराच्या रक्षणासाठी हजर असतात. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही मुंबई पोलिस आपलं कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाउन काळात शहराच्या बंदोबस्ताची काळजी घेण्याचं काम पोलिसांच्या खांद्यावर आहे. यावेळी आपल्या घरातल्या लोकांची चिंता न करता पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदीता सराफ यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

सराफ दाम्पत्य लोखंडवाला कॉम्पेक्समध्ये राहतात. हा भाग ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधत अशोक आणि निवेदीता सराफ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आमरस पुरीचं जेवण द्यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. पोलीसांकडून परवानगी मिळताच सर्व कर्मचाऱ्यांसाठी आमरस पुरीचं जेवण तयार करत स्वतः निवेदीता सराफ पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.

सध्याच्या खडतर परिस्थितीत तुम्ही जे काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर आहे आणि तसाच राहिलं, अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरही अशोक सराफ आणि निवेदीता सराफ यांनी मुंबई पोलिसांप्रती दाखवलेल्या प्रेमाचं कौतुक होताना दिसत आहे.

Story img Loader