नाकात नळी.. केमोथेरपीमुळे डोक्यावरचे केस गेलेले.. एकूणच चेहरा हरवलेल्या विमनस्क अवस्थेतील त्या कर्करुग्ण तरुणीच्या ताटात सुग्रास अन्न वाढले जाते, तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटते. तिच्या पाठोपाठ इतरही कर्करुग्णांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाइकांना नमस्कार करून जेवणाची पंगत रस्त्यावरच मांडली जाते.. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयानजीकच्या एका गल्लीतील हे नेहमीचेच दृश्य. गेली २६ वर्षे हा अन्नदानाचा अखंड यज्ञ येथे सुरू आहे. रुग्णसेवेचा कोणताही गाजावाजा नाही की अवडंबर नाही. ५६ वर्षीय हरखचंद सावला हे या रुग्णसेवेचे प्रणेते. कर्करुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी ते ‘जीवन ज्योत’ बनले आहेत!
साधारण २६ वर्षांपूर्वीची गोष्ट. परळमध्येच राहणाऱ्या हरखचंद सावला यांना एका मायलेकीने टाटा रुग्णालयाचा पत्ता विचारला. मात्र, सावला यांनी त्यांना पालिकेच्या शीव येथील पालिका रुग्णालयाचा पत्ता दिला. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी मोफत उपचार केले जातात, हे त्यावेळी त्यांच्या गावीही नव्हते.
नंतर त्या कर्करुग्ण मुलीवर उपचार होऊन ती बरीही झाली. परंतु परळमध्ये राहूनही आपल्याला ‘टाटा’संबंधी योग्य माहिती नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील, या विचाराने अस्वस्थ झालेल्या हरखचंदभाईंनी नंतर कर्करुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्याचा वसाच घेतला. बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे जेवणाचे होणारे हाल, आर्थिक परिस्थिती, रस्त्यावरचा मुक्काम पाहून त्यांचे हृदय हेलावले, आणि रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी ‘जीवन ज्योत’नावाचा ट्रस्टही स्थापन केला व पूर्णवेळ रुग्णसेवा करता यावी यासाठी स्वत:चे चांगले चालणारे हॉटेल भाडय़ाने देऊन टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या गल्लीतील कोंडाजी चाळीत एक जागा घेऊन अन्नदानाचा यज्ञ सुरू केला. आजही हा यज्ञ अव्याहत सुरू आहे.
रोज साडेसहाशे
दररोज किमान साडेसहाशे लोक ‘जीवन ज्योत’च्या अन्नछत्राचा लाभ घेतात. केवळ टाटा रुग्णालयातीलच नव्हे तर जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि कामा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान केले जाते. अनेक जणांच्या आर्थिक मदतीमुळेच हे शक्य होते असे सावला नम्रपणे नमूद करतात. या सत्कार्यात सावला यांना त्यांची पत्नी निर्मला यांची मोलाची साथ लाभली आहे.
विविध ६० उपक्रम
अन्नदानाशिवाय ‘जीवन ज्योत’तर्फे मोफत रुग्णवाहिका, रक्तदान, कर्करोगग्रस्त मुलांसाठी खेळण्याची बँक, रुग्णांना मार्गदर्शन, औषधासाठी मदत तसेच शस्त्रक्रियेनंतर गरजेनुसार पाय बसविण्यापासून आवश्यक ती उपकरणे उपलब्ध करून देणे, असे सुमारे ६० उपक्रम ‘जीवन ज्योत’च्या माध्यमातून राबविले जतात. यासाठी लोकांकडून रद्दी, जुने कपडे तसेच खेळणी स्वीकारली जातात. या उपक्रमाला हातभार लावायचा असल्यास ९८६९२०६४०० किंवा २४१२५८४८ वर संपर्क साधावा.
कर्करुग्णांसाठी ‘जीवन ज्योत’
नाकात नळी.. केमोथेरपीमुळे डोक्यावरचे केस गेलेले.. एकूणच चेहरा हरवलेल्या विमनस्क अवस्थेतील त्या कर्करुग्ण तरुणीच्या ताटात सुग्रास अन्न वाढले जाते

First published on: 12-01-2014 at 05:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lifeline cancer patients