करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना बंद झालेली उपनगरी रेल्वेची दारे आज, सोमवारी जवळपास दहा महिन्यांनी खुली होत आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनही सज्ज झाले असून, बंद असलेले सर्व सरकते जिने, प्रवेशद्वारे, पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.

सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने शनिवारी, रविवारी सर्व स्थानकांतील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वेवरील एकूण ३०१ तिकीट खिडक्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहेत. शिवाय सर्व ‘एटीव्हीएम’ही सेवेत रुजू होत असून, तिथे रेल्वेचे मदतनीसही तैनात करण्यात येणार आहेत. टाळेबंदीत उपनगरी स्थानकांतील केवळ ८६ प्रवेशद्वारे खुली होती. आता १९८ प्रवेशद्वारे खुली के ली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे स्थानकांवरील ५० सरकते जिने व ३० उद्वाहने, तर मध्य रेल्वेवरील ७६ सरकते जिने, ४० उद्वाहने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच बंद के लेले काही पादचारी पूलही पुन्हा खुले करण्यात येणार आहेत.

मध्य, पश्चिम रेल्वेवरील १५६ रेल्वे फेऱ्यांची प्रतीक्षा

रेल्वेने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचारी व महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता मध्य व पश्चिम रेल्वेने २९ जानेवारीपासून लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्य रेल्वेने दिवसाला होणाऱ्या एक हजार ५८० फे ऱ्या एक हजार ६८५ पर्यंत वाढवल्या. पश्चिम रेल्वेवरील लोकल फे ऱ्या एक हजार २०१ वरुन एक हजार ३०० पर्यंत वाढवण्यात आल्या. टाळेबंदीआधी पश्चिम रेल्वेवर एक हजार ३६७ आणि मध्य रेल्वेवर एक हजार ७७४ फेऱ्या होत होत्या. दोन्ही मार्गावरील लोकल फे ऱ्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रवाशांच्या गर्दीचा आढावा घेऊन दोन्ही मार्गावरील ऊर्वरित १५६ फे ऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका रेल्वेने घेतली आहे.

एसटीच्या फेऱ्यांमध्ये कपात

करोनाकाळात सामान्यांसाठी रेल्वेप्रवास बंदच असल्याने बेस्ट व एसटी गाडय़ांनी मुंबई महानगरात सेवा दिली. यात बेस्टच्या ताफ्यात एक हजार बसगाडय़ाही दाखल झाल्या. सोमवारपासून रेल्वे सुरू होत असल्याने एसटी महामंडळाने बेस्टच्या ताफ्यातील १०० बस कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी त्याच्या २०० फे ऱ्या कमी होतील. त्यानंतर आणखी ३०० ते ४०० बसगाडय़ा टप्प्याटप्यात ताफ्यातून काढून घेतल्या जाणार आहेत.

प्रवासवेळेचे बंधन

पहाटे पहिल्या उपनगरी रेल्वेगाडीपासून ते सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत, तसेच रात्री ९ नंतर सर्वाना रेल्वेप्रवासाची मुभा असेल. दरम्यानच्या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच स्थानकात प्रवेश असेल. त्यामुळे प्रवाशांवर तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुखपट्टी नसेल तर प्रवासास मनाई

मुंबई : करोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर स्थानिक महापालिका, नगरपालिकांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी मुखपट्टीचा वापर बंधनकारक असेल. अन्यथा, प्रवासास मनाई करण्यात येईल. प्रत्येक रेल्वे स्थानकात अपेक्षित गर्दीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), गृहरक्षक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित जवान तैनात असतील.