‘लोकसत्ता लोकांकिका’ला राज्यभरातून उदंड प्रतिसाद; २६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

राज्यभरातील महाविद्यालयीन नाटय़वेडय़ांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जगासमोर आणणाऱ्या या स्पर्धेची तयारी महाविद्यालयांमधून सुरू झाली असून आता स्पर्धेची उत्कंठाही ताणली गेली आहे. स्पर्धेची ‘तिसरी घंटा’ होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी असून २६ नोव्हेंबरपासून राज्यातील आठ केंद्रांवर ‘धुमशान’ सुरू होणार आहे.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी कलावंतांची प्रतिभा जोखण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी-युवा’वर प्रक्षेपित करत या स्पर्धकांना जगभरात पोहोचवणारी आणि त्याच वेळी आयरिस प्रॉडक्शनसारख्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धकांची गुणवत्ता हेरणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा आहे. गेली तीन वर्षे अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

महाविद्यालयीन मुले खूप ताकदीने नवीन विषय हाताळून त्यावर व्यक्त होतात. या महाविद्यालयांकडून अतिशय अल्प प्रवेश शुल्क घेऊन त्यांना नेपथ्याच्या प्राथमिक साहित्यापासून प्रकाशयोजनेपर्यंत सर्वच गोष्टी मोफत पुरवून ‘लोकसत्ता लोकांकिका’ त्यांच्यावरील भार हलका करते. त्याचप्रमाणे आयरिस प्रॉडक्शनच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मनोरंजन जगताची कवाडेही खुली केली जातात.

यंदा ही स्पर्धा २६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर या आठ केंद्रांवर होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक (तालीम), विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये पार पडेल. १७ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या महाअंतिम फेरीत आठही विभागांमधील अंतिम स्पर्धेत अव्वल ठरलेल्या एकांकिका सादर होणार आहेत.

महाअंतिम फेरी झी युवावरही पाहा!

राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.

Story img Loader