‘लोकसत्ता लोकांकिके’ची प्राथमिक फेरी २६ नोव्हेंबरपासून, १७ डिसेंबर रोजी महाअंतिम फेरी
‘रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून ‘लोकसत्ता’ सविनय सादर करीत आहे, महाराष्ट्रातल्या तमाम महाविद्यालयीन तरुणांच्या नाटय़प्रतिभेला वेगळी उंची प्राप्त करून देणारी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, ‘लोकसत्ता लोकांकिका’..!’ रंगभूमीवर वेगळे काही करू पाहाणाऱ्या प्रयोगशील महाविद्यालयीन तरुणांसाठी एक आगळे आव्हान असलेली ही स्पर्धा यंदा २६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. राज्यातील आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर या स्पर्धेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यामुळे, महाविद्यालयीन नाटय़वेडय़ा गुणवंतहो, तयारीला लागा!
राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुण रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने करत असतात. मात्र या प्रयोगांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या तरुणांची ऊर्जा, त्यांच्या कल्पना लोकांसमोर याव्यात, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन सुरू केले. पहिल्याच वर्षी राज्यभरातील २००हून अधिक महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका प्राथमिक फेरीत सादर केल्या आणि ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमावर पसंतीची मोहोरही उमटवली.
मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा घेतली जाते. सर्वप्रथम आठही केंद्रांवर प्राथमिक फेरीतून उत्तम एकांकिका त्या विभागांमधील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातात. त्यानंतर विभागीय अंतिम फेरीत पहिली आलेली एकांकिका त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाअंतिम फेरीत दाखल होते. या अनोख्या रचनेमुळे स्पर्धा आणखी रंगतदार होते.
यंदा ही स्पर्धा खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव थोडी उशिरा म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होणार आहे. प्रत्येक केंद्रावर वेगवेगळ्या दिवशी प्राथमिक फेऱ्यांचे आयोजन केले जाईल. त्यानंतर विभागीय अंतिम फेरी होणार असून त्यातून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिका महाअंतिम फेरीत १७ डिसेंबर रोजी सादर होतील. या स्पर्धेचे विस्तृत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
- प्राथमिक फेरी : २६ नोव्हें. पासून
- केंद्र : मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर
- महाअंतिम फेरी : १७ डिसेंबर
(विस्तृत वेळापत्रक लवकरच)