‘लोकसत्ता लोकांकिका’तील गुणवत्ता हेरण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन सज्ज
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून, विविध महाविद्यालयांमधून आलेले तरुण रंगकर्मी.. प्रत्येकाची एकांकिका वेगळी, प्रत्येकाचा आविष्कार वेगळा.. प्रत्येक संघाला उपलब्ध असलेले स्रोत वेगळे.. पण प्रत्येकाच्या मनात एकच जिद्द, आपल्या महाविद्यालयाच्या एकांकिकेला महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ बनवण्याची! ही जिद्द प्रत्यक्षात उतरण्यासाठी आता जेमतेम दोन आठवडय़ांचा कालावधी राहिला असून ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा रंगमंच सज्ज झाला आहे. २६ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत राज्यभरातून येणाऱ्या गुणवत्तेच्या खाणीतून योग्य हिरे वेचून त्यांना विविध मालिका, चित्रपट किंवा नाटके यांचे कोंदण देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शनही सज्ज झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने सुरू झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला पहिल्या वर्षांपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील आठ केंद्रांवर रंगणारी प्राथमिक फेरी, त्यातून निवडलेल्या उत्कृष्ट एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी आणि त्यात पहिल्या आलेल्या आठ विभागांतील सवरेत्कृष्ट आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी या अनोख्या स्वरूपामुळे महाविद्यालयीन जगताच्या पसंतीलाही ही स्पर्धा उतरली. गेल्या दोन वर्षांमध्ये या स्पर्धेतील लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांच्याबरोबरच प्रकाशयोजनाकार यांना मराठी मनोरंजनक्षेत्रात प्रवेश मिळवून देण्याचे कामही या स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शनने पार पाडले आहे.
यंदा ही स्पर्धा २६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असून ती मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी मुंबई व पुणे वगळता संपूर्ण राज्यभरातील गुणवत्ता समोर येणे कठीण होते. पण ‘लोकसत्ता’ आणि ‘अस्तित्व’ यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या या स्पर्धेमुळे आम्हालाही राज्यभरात पोहोचता आले. तेथील कलाकारांचे प्रत्यक्ष सादरीकरण पाहता आले. त्यामुळे या कलाकारांना मनोरंजन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहातील संधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करता आले, असे ‘आयरिस प्रॉडक्शन’चे विद्याधर पाठारे यांनी सांगितले.
पहिल्या वर्षांच्या तुलनेत दुसऱ्या वर्षीचे राज्यभरातील प्रयोग खूपच चांगले होते. अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद येथील मुले प्रचंड मेहनतीने आणि ताकदीने प्रयोग करताना दिसली. यंदा या स्पर्धेच्या माध्यमातून काय काय नवीन प्रयोग पाहायला मिळतात, हे बघण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही पाठारे यांनी सांगितले.
प्रवेशिका कुठे?
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना आपले अर्ज २१ नोव्हेंबपर्यंत सादर करता येणार आहेत. हे अर्ज व प्रवेशिका indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
महाअंतिम फेरी ‘झी युवा’वरही पाहा!
राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.