‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे पडघम
अदिती सारंगधर, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, स्पृहा जोशी, अमेय वाघ या आणि अशा अनेक मराठी चित्रपट-नाटय़-मालिका सृष्टीतील आघाडीच्या कलावंतांमध्ये काय साम्य आहे? बरोबर, सगळेच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधून नावारूपाला आलेले कलावंत आहेत. त्यामुळेच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाना ‘कलाकार घडवणारी प्रयोगशाळा’ असे म्हटले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांमधील तरुण रंगकर्मीना आव्हान देणारी सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही ‘महा-प्रयोगशाळा’ २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असून या प्रयोगशाळेत घडण्यासाठी राज्यभरातील कलाकारांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अॅकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे सुरुवातीपासूनच ही स्पर्धा चुरशीची आणि आव्हानात्मक ठरत आहे. अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी २०० महाविद्यालयांनी सहभाग नोंदवत स्पर्धेचे यश अधोरेखित केले. यंदाही या गुणी कलाकारांची गुणवत्ता हेरण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन या स्पर्धेत टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. यंदा २६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेची तयारी महाविद्यालयांमध्ये सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर होणारी ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेतली जाते. प्रत्येक केंद्रावर होणाऱ्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या उत्कृष्ट एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर होतात. प्रत्येक विभागात सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी होते आणि त्यातून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडली जाते.
महाअंतिम फेरी
‘झी युवा’वरही पाहा!
राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.
प्रवेशिका कुठे?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना आपले अर्ज २१ नोव्हेंबपर्यंत सादर करता येणार आहेत. हे अर्ज व प्रवेशिका indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.