प्रवेश अर्ज २४ नोव्हेंबपर्यंत सादर करता येणार, सहभागासाठी नाममात्र शुल्क, प्रयोगाचा खर्चही नगण्य
तालमींसाठी दिवसरात्र चाललेली जागरणे.. प्रयोग गोळीबंद करण्यासाठीचा आटापिटा.. एकांकिकेचे संगीत करतानाची तन्मयता.. बॅकस्टेज आर्टिस्टची मेहनत.. ‘चक्री’ मारताना किंवा घाम गाळून ‘रन थ्रू’ करताना लागलेली ‘इन्टेन्सिटी’.. या सगळ्याचे मोल दुसऱ्या कशातही करता येणे अशक्य आहे. तरीही ‘लोकसत्ता’ राज्यभरातील रंगकर्मीच्या या अजोड मेहनतीला कुर्निसात करण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेद्वारे करणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेतील विविध पारितोषिकांपोटी यंदा तब्बल साडेतीन लाख रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सुट्टय़ांनंतर महाविद्यालये नुकतीच सुरू झाली असल्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’चे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची तारीख २४ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अॅकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी कलावंतांची प्रतिभा जोखण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी-युवा’वर प्रक्षेपित करत या स्पर्धकांना जगभरात पोहोचवणारी आणि त्याच वेळी आयरिस प्रॉडक्शनसारख्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धकांची गुणवत्ता हेरणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा आहे. गेली तीन वर्षे अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेला उदंड प्रतिसादही मिळत आहे.
महाविद्यालयीन मुले खूप मेहनतीने आणि ताकदीने नवनवीन विषय हाताळत असतात. अनेक महाविद्यालये पुरेसा निधी नसतानाही मुलांच्या हौसेपोटी स्पर्धा करतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’चे आयोजन करताना आम्ही हे भान बाळगतो. म्हणूनच या स्पर्धेचे प्रवेश शुल्कही नाममात्र आहे. तालीम फेरी सादर करताना विद्यार्थ्यांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. तसेच विभागीय अंतिम व महाअंतिम फेरीदरम्यान नेपथ्य, प्रकाशयोजना आणि रंगभूषा यांसाठी लागणारे साहित्यही आम्ही एकही पैसा न घेता पुरवतो. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ‘अस्तित्त्व’च्या रवी मिश्रा यांनी स्पष्ट केले. यंदा ही स्पर्धा २६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर या आठ केंद्रांवर होणार आहे. १७ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या महाअंतिम फेरीत आठही विभागांमधील अंतिम स्पर्धेत अव्वल ठरलेल्या एकांकिका सादर होणार आहेत.
महाअंतिम फेरी ‘झी युवा’वरही पाहा!
राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.
प्रवेशिका कुठे?
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना आपले अर्ज २४ नोव्हेंबपर्यंत सादर करता येणार आहेत. हे अर्ज व प्रवेशिका www. loksatta.com/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.