शनिवारपासून लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची सुरुवात; रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीपासून स्पर्धेची ‘नांदी’
कोकणची भूमी ही नाटय़वेडय़ांसाठी ओळखली जाते. मराठीतील पहिले व्यावसायिक नाटक आणि नाटय़कंपनी सांगली येथे सुरू झाली, तरी कोकणातल्या दशावतारांनी किमान दोन शतके कोकणी माणसाला रिझविले आहे. रात्रीच्या प्रहरी सुरू झालेले दशावतारी नाटक पहाटेचे तारे विझू लागेपर्यंत पाहत राहणाऱ्या कोकणी माणसाचे हे नाटय़वेड लक्षात घेऊनच सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा ‘पडदा’ रत्नागिरी केंद्रावरून उद्या, शनिवारी उघडणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे भरतवाक्य म्हणजेच महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांची गुणवत्ता हेरून त्यांच्यासाठी मराठी मनोरंजनक्षेत्राची कवाडे खुली करण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. गेली तीन वर्षे अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
यंदा ही स्पर्धा २६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर या आठ केंद्रांवर होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक (तालीम), विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये पार पडेल. १७ डिसेंबर रोजी मुंबईत रंगणाऱ्या महाअंतिम फेरीत आठही विभागांमधील अंतिम स्पर्धेत अव्वल ठरलेल्या एकांकिका सादर होणार आहेत.
महाअंतिम फेरी ‘झी युवा’वर!
राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.