प्रभादेवीतील रवींद्र नाटय़ मंदिरात १९ महाविद्यालयांच्या एकांकिका

मुंबईतील गिरणगावातील कामगारांच्या नाटकांपासून ते साहित्य संघातील नाटय़ चळवळीपर्यंत आणि छबिलदासच्या छोटय़ा रंगमंचापासून ते एनसीपीए-पृथ्वी अशा मोठय़ा नाटय़गृहापर्यंत.. शहराची नाटय़परंपरा मोठी आहे. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे महाविद्यालयातील तरुणांच्या एकांकिका! या तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला आणि प्रायोगिकतेला योग्य व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेची मुंबई विभागाची प्राथमिक फेरी आज, रविवारी रंगणार आहे. या फेरीत मुंबईतील १९ महाविद्यालये आपापल्या एकांकिका तालीम स्वरूपात सादर करणार आहेत. प्रभादेवीतील ‘रवींद्र नाटय़ मंदिर’च्या ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या तालीम हॉलमध्ये होणाऱ्या या प्राथमिक फेरीसाठी टॅलेण्ट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’चे प्रतिनिधीही उपस्थित असतील.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हा मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील एक महत्त्वाचा घटक आहे. महाविद्यालयांतील तरुण लेखकांच्या प्रतिभेला आव्हान देण्यापासून ते तरुण दिग्दर्शकांना रंगभूमीच्या अवकाशातील विविध शक्यता पडताळून पाहण्यास उद्युक्त करणाऱ्या या एकांकिका स्पर्धानी मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीला अनेक चमकदार कलाकार दिले. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेच्या पहिल्या पर्वातही ताज्या दमाच्या लेखकांनी लिहिलेल्या ‘बीइंग सेल्फिश’, ‘बीडी-एसी’ अशा काही एकांकिकांनी वाहवा मिळवली होती. यंदा या स्पध्रेच्या दुसऱ्या वर्षी मुंबईतील १९ महाविद्यालये एकांकिका सादर करणार आहेत. यातून निवडलेल्या एकांकिका मुंबई विभागाच्या अंतिम फेरीत दाखल होतील.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेसाठी यंदा रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.४ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे साहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रांवर होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पध्रेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत. मुंबई विभागातील प्राथमिक फेरीसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या क्रिएटिव्ह हेड आणि दिग्दíशका सुवर्णा मंत्री आणि मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील प्रथितयश दिग्दíशका प्रतिमा कुलकर्णी उपस्थित असतील. मुंबईतील गुणवान कलाकारांची प्रतिभा जोखून त्यांना मालिका, नाटक आणि चित्रपट यांत वाव देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’चे हे प्रतिनिधी अशा कलाकारांकडे लक्ष ठेवून असतील.