स्त्रियांमधला उद्योजक घडवला की त्यांच्या पुढची पिढीही नक्कीच उद्यमशील बनते, हा द्रष्टा विचार करत स्त्रियांना उद्योजिका बनवण्याचा वसा घेत आपली बँकेतील व्यवस्थापकपदाची नोकरी त्यांनी सोडली आणि ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून ४५०० उद्योजिका घडवल्या. आज केवळ दिवाळीदरम्यान त्यांची २० लाख रुपयांहून अधिक रकमेची फराळाची विक्री होते. ‘स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था’ आणि ‘व्ही. टी. पाटील फाऊंडेशन’ची स्थापना करून स्त्रियांना, कोल्हापूरच्या ग्रामीण जनतेला आत्मनिर्भर बनवणाऱ्या. या संस्थेमार्फत ९०० शहरी, ३० हजार ग्रामीण स्त्रिया आणि १५० उत्तम कार्यकर्त्यांचा मधुकोश विणणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत कांचन परुळेकर.

या दशकभरात ‘महिला सक्षमीकरण’ हा जणू परवलीचा शब्द झाला आहे. स्त्रियांना स्वावलंबी करण्याचा निर्धार प्रत्येक सभा, संमेलनात ऐकू येतोच. मात्र दोन तपांपूर्वी कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात कृतिशीलपणे उतरवण्याचे कार्य केले गेले ते ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेच्या मार्फत. शहरापासून वाडय़ा-वस्त्यांवरील स्त्रियांना एकत्र जमवून त्यांना स्वालंबनाचा मंत्र देण्यासाठी सुस्थितील नोकरीचा त्याग करून नारी उद्धाराच्या कार्यात उतरलेल्या कांचनताई परुळेकर यांच्या ‘स्वयंसिद्धा’तील योगदानामुळे आज येथील हजारो स्त्रियांनी उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल टाकून त्याचा हमरस्ता तयार केला आहे. उद्योजक घडवण्यासाठी कांचनताईंचा पुढचा संकल्प आहे, दीड कोटी रुपये खर्चाची प्रशिक्षण संकुलाची स्थापना!

ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक आणि कोल्हापूरच्या सामाजिक कार्यात मोठे योगदान देणारे दिवंगत खासदार डॉ. व्ही. टी. पाटील आणि त्यांच्या दिवंगत पत्नी सरोजनीदेवी यांच्या असीम त्यागातून उभ्या असलेल्या सरोजनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाचा प्रकल्प म्हणून १९९२ मध्ये ‘स्वयंसिद्धा’ आकाराला आली. स्त्री-मुक्तीच्या अवास्तव कल्पना स्त्रियांच्या मनी न रुजवता अर्थकारणातून महिला सबलीकरणाची वाट ‘स्वयंसिद्धा’ने चोखाळली आहे. त्यासाठी त्यांनी प्रबोधन, प्रशिक्षण, स्वयंम निर्भयता या त्रिसूत्रीचा अवलंब केला. हे करताना ‘स्वयंसिद्धा’ने वेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. आई उद्योजिका बनली, तर पुढची पिढी उद्योजक बनेल, या विश्वासाने स्त्रियांमध्ये व्यावसायिक कौशल्य व वर्तणूक कौशल्य पेरण्यास प्रारंभ केला.

खरे तर कांचनताई या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये व्यवस्थापिका या पदावर कार्यरत होत्या. पण स्त्रियांना स्वयंनिर्भर करण्यासाठी पूर्णवेळ कामाची गरज लक्षात घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांची हेटाळणी झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करीत कांचनताईंनी स्त्रियांच्या एकत्रीकरणाला सुरुवात केली. परिणामी, सुरुवातीच्या १३६ स्त्रियांची संख्या वाढत जाऊन आज ९०० शहरी, ३० हजार ग्रामीण महिला आणि १५० उत्तम कार्यकर्त्यां यांचा मधुकोश विणला गेला आहे. ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून त्यांनी ४५०० उद्योजिका तयार केल्या आहेत. त्यातील काही उद्योजिका तर लाखो रुपयांमध्ये खेळत आहेत.

स्त्रियांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे ही महत्त्वाची निकड. ती लक्षात घेऊन कांचनताईंनी १९९४ मध्ये ‘स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था’ याची स्थापना केली तर ग्रामीण जनतेला पत, प्रतिष्ठा आणि पसा प्राप्त करून देण्यासाठी ‘व्ही.टी. पाटील फाऊंडेशन’ची स्थापना केली. गेली २४ वष्रे ‘स्वयंसिद्धा’ संचालिका म्हणून या तिनही संस्थातील स्त्रियांच्या संघटना, बचत गट यांचे बळकटीकरण, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना सातत्याने अनौपचारिक पद्धतीने शिक्षण देत त्यांच्यात सामाजिक भान जागृत करणे यासाठी नानाविध उपक्रम राबवत आहेत.

सर्व स्तरातील स्त्रियांसाठी ‘स्वयंसिद्धा’ हे माहेरघर बनले आहे. नाममात्र मूल्य घेऊन ३० प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. संगणक हाताळणी, विविध हस्तकला, पस्रेस, पाककलेपर्यंतच्या अनेक व्यवसायांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इथपर्यंत जाऊन बचत गट संकल्पना आणि उद्योजकीय प्रेरणा यांचे प्रशिक्षण ही संस्था देते. संस्थेची अनेक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहेत. मार्गदिपा अंतर्गत, गरीब-गरजू १५० विद्यार्थिनींना दर वर्षी आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती, गणवेश व दरमहा मार्गदर्शन दिले जाते. येथे शिकणाऱ्या मुली तीन हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात. संस्थेच्या या शाळेत नापास झालेल्या मुलीदेखील भरती करून घेतल्या होत्या. पण आता त्यातील काहींनी उंच भरारी घेतली आहे. केवळ उत्तीर्ण होण्याचे नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही सर्वच क्षेत्रात उत्तीर्ण होण्याचा मंत्र त्यांना या शाळेत गवसला आहे.

वस्तू बनवायची आणि त्याची थेट विक्री करून कमाई करायची, असा साधा सोपा विचार अनेकांच्या डोळ्यांसमोर असतो, पण कांचनताईंनी ‘स्वयंसिद्धा’मध्ये पाऊल टाकलेल्या स्त्रियांना हा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. त्यांच्यासमोर व्यवसाय म्हणजे काय, त्याचे पथ्य काय, उत्पादनाचा दर्जा, घरचे सांभाळून व्यवसायासाठी द्यावयाचा वेळ, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व असा एक व्यापक पट त्या मांडतात. या सूत्रामध्ये त्यांना परिपूर्णपणे बांधून घेतले जाते आणि त्यांच्या आवड-गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवायला प्रवृत्त केले जाते. इथल्या वस्तूंच्या दर्जाची कल्पना आल्याने कसलीही जाहिरात न करता दिवाळीला २० लाख रुपयांहून अधिक रकमेची फराळाची विक्री होते. शिवाय छोटय़ा-मोठय़ा प्रदर्शन, दैनंदिन विक्री या माध्यमातूनही स्त्रियांना कमाईचे साधन प्राप्त झाले आहे. यामुळे ‘स्वयंप्रेरिका’ सहकारी औद्योगिक संस्थेचीही आर्थिक भरभराट झाली आहे. या वर्षी संस्थेने १५ टक्के लाभांश आणि साडेतीन टक्के रिबेट देऊन आर्थिक प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे, हे दाखवून दिले आहे.

‘स्वयंसिद्धा’चे काम सुरू करतानाच शासकीय मदत न घेता स्वबळावर गाडा हाकण्याचा संकल्प कांचनताईंनी केला होता. आजवरची प्रगती शासकीय मदतीविना झाली आहे. न मागता स्वयंस्फूर्तीने येणाऱ्या देणगीच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याचा वृक्ष बहरला आहे.

‘स्वयंसिद्धा’च्या कार्याची दखल घेऊन ‘सारडा समान संधी’ हा साडेसात लाख रुपयांचा पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना मिळाला होता. ताईंनी ही रक्कम संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केली. संस्थेच्या कार्याची धुरा आता पुढची पिढी सांभाळत आहे. तृप्ती पुरेकर (स्वयंसिद्धा), जयश्री गायकवाड (स्वयंप्रेरिका), सौम्या तिरोडकर (व्ही.टी. फाऊंडेशन) यांच्यासह अन्य संचालिका सांभाळत आहेत. संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. बाबुराव चौगुले यांनी करणुर (ता. कागल) येथे पाच गुंठे जागा संस्थेला देऊ केली आहे. तेथे दीड कोटी रुपये खर्च करून प्रशिक्षण संकुल उभारले जाणार आहे. याचा लाभ महाराष्ट्र-कर्नाटकातील स्त्रियांना होणार आहे. या कामासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. संस्थेचे कार्य पाहून देणगीदारांनी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्त्रियांना उद्यमशीलतेचा मार्ग दाखवून त्यांना आर्थिक साक्षर करणाऱ्या कांचन परुळेकर यांना आमचा सलाम!