गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, शरद उपाध्ये विशेष अतिथी
‘कोलावरी ते शांताबाई’ सारख्या लोकप्रिय विषयापासून ते ‘धर्म आणि दहशतवाद’ सारख्या गंभीर विषयापर्यंत आणि त्याहीपुढे जात ‘बीईंग ‘सेल्फी’श’ सारख्या स्वत:वर येऊन विचार करायला लावणाऱ्या विषयांवर सहज पण मुद्देसूद मांडणी करणाऱ्या आठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी अनुभवता येणार आहे. काळानुसार बदलत जाणारे संदर्भ, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर स्वतंत्रपणे काही नवे विचार मांडण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी रविंद्र नाटय़मंदिर येथे होत आहे.
राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आठ युवा वक्त्यांची शाब्दिक लढाई अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये यांच्या खास उपस्थितीत रंगणार आहे. या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी सवार्ंसाठी खुली असून संध्याकाळी पावणेसहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.
तीन आठवडय़ांपूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांमधून या स्पर्धेची सुरुवात झाली. प्राथमिक व त्यानंतर विभागीय अंतिम फेऱ्यांमधून तावून सुलाखून निघालेल्या वक्त्यांना आता अंतिम फेरीत स्वतच्या वक्तृत्व शैलीचा अविष्कार दाखवण्याची संधी मिळत आहे. त्यापूर्वी या वक्त्यांच्या भाषणाची धार वाढवण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात स्पर्धकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेतली जाणार आहे. विषयाची मांडणी, अचूक माहिती, शब्दांची लय, वेग अशा वक्तृत्वाच्या विविध अंगांबाबत तज्ज्ञांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.
या कार्यशाळेनंतर रविवारी, १४ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. आठही स्पर्धक यावेळी वेगवेगळ्या विषयांवर आपले वक्तृत्व सादर करतील. यातून पहिल्या क्रमांकावर नाव कोरणाऱ्या स्पर्धकाला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी यांच्या हस्ते ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने गौरविले जाईल.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ यांचे सहकार्य आणि ‘पॉवर्ड बाय सिंहगड इन्स्टिटय़ुट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’ आणि ‘आयसीडी’ असलेल्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची महाअंतिम फेरी प्रेक्षकांसाठी खुली आहे. ‘स्टडी सर्कल’ आणि ‘युनिक अॅकॅडमी’ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.
आठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी
गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, शरद उपाध्ये विशेष अतिथी
Written by लोकसत्ता टीम
First published on: 13-02-2016 at 02:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta oratory competition at sunday