मान्यवरांच्या उपस्थितीत महाअंतिम फेरी उत्साहात; रसिकांचा तुडुंब प्रतिसाद
विषयांची वैविध्यता, तुडुंब भरलेले सभागृह आणि राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकत महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आठ वक्ते.. अशा भारलेल्या वातावरणात रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. महाराष्ट्राचा वक्ता दशहस्रेषु ठरण्यासाठी आठ वक्त्यांमध्ये रंगलेल्या चुरशीत अखेरीस बाजी मारली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विवेक चित्ते याने. तर रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचा ऋषिकेश डाळे स्पर्धेचा उपविजेता ठरला. पनवेलच्या पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस्च्या रिद्धी म्हात्रेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्राची वक्त्यांची, विचारवंतांची दैदिप्यमान परंपरा पुढे नेताना तरुण पिढीतील नव्या वक्त्यांचा शोध घेणाऱ्या ’लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेचा महाअंतिम सोहळा रविवारी रवींद्र नाट्यगृहात रंगला. या सोहळ्याला ‘राशीचक्र’ कार शरद उपाध्ये आणि अभिनेता व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पध्रेच्या महाअंतिम फेरीसाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि कवयित्री नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
राज्यभरातील आठ शहरांमधून आलेल्या स्पर्धकांमधून ‘वक्ता दशहस्रेषु’ निवडणाऱ्या या स्पध्रेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले विषय हे त्यांच्या रोजच्या जगण्यातीलच असले तरी ते सोपे नव्हते. त्यामुळे विषयांची मांडणी करताना साहजिकच पुस्तकी संदर्भाच्या पलिकडे जात विद्यार्थ्यांना विचार करावा लागला हे त्यांच्या भाषणातून उपस्थितांनाही जाणवले. ‘लंगिकतेपलीकडचे जग’ हा विषय प्रथम मांडला गेला. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर या विषयाची मांडणी करताना पुण्याच्या निखिल कुलकर्णीने काळानुसार बदलत गेलेल्या स्त्री-पुरुष संबंधांचा वेध घेत पुराणकाळापासूनच या नात्यात लैंगिकतेपलीकडले मैत्र कसे महत्वाचे होते हे अनेकिवध उदाहरणांनी पटवून दिले.
‘बंदी, सक्ती सरकारनामा’ या विषयावर बोलताना मुळात बंदी, सक्ती आणि सरकार या तीन घटकांचा एकमेकांशी संबंध कसा असतो, याची सहज मांडणी नगरच्या विनया बनसोडेने केली. सुजाण नागरिक म्हणून नियम पाळले जात नाहीत, मग सरकार म्हणजेच आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना व्यवस्थेचा गाडा हाकण्यासाठी बंदी किंवा सक्तीचा आधार घ्यावा लागतो हे स्पष्ट करताना अर्निबध स्वातंत्र्याने वागणाऱ्या समाजावर सक्ती, बंदीमुळेच सुनियंत्रण साधता येते, असे मत तिने मांडले.
विजेत्यांची नावे
* विवेक चित्ते, नाशिक
(यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) : प्रथम पारितोषिक
* ऋषिकेश डाळे, रत्नागिरी (फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट) : द्वितीय पारितोषिक
* रिद्धी म्हात्रे, ठाणे (पिल्लई कॉलेज ऑफ कॉमर्स, पनवेल) : तृतीय पारितोषिक
* आदित्य जंगले, मुंबई (रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा) : उत्तेजनार्थ
* भुवनेश्वरी परशुरामकर, नागपूर (मॉरिस महाविद्यालय) : उत्तेजनार्थ
* लालित्यपूर्ण, शैलीदार वक्तृत्वासाठी प्रा. वसंत कुंभोजकर पुरस्कार : ऋषिकेश डाळे, रत्नागिरी
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ ठरल्याचा आनंद झाला आहे. आजवर राज्यभरातील अनेक स्पर्धा जिंकल्या मात्र या स्पर्धेच्या व्यासपीठावर मिळणारा आनंद आणि आदर खूप महत्वाचा वाटतो. शनिवारची रात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर काढताना केवळ विषयाची मांडणी ही स्वत:च्या अनुभवातून आणि अभ्यासातून करण्याचा प्रयत्न केला.
– विवेक चित्ते (प्रथम क्रमांक)
अत्यंत अनपेक्षित असा हा विजय आहे. यासाठीच केला होता सारा अट्टहास, अशी भावना मनात घर करून आहे. अत्यंत वेगळे विषय होते. त्यामुळे त्याची मांडणीही त्याच पद्धतीने करावी लागली. अनपेक्षिपणे जे घडते तेच खरे आयुष्य याची प्रचिती आज मी घेतली.
– ऋषिकेश डाळे (द्वितीय क्रमांक व लालित्यपूर्ण शैलीदार वक्तृत्व पुरस्कार)
हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. मागच्या वर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. यंदा ‘माझी धर्मचिकित्सा’ या सारख्या वेगळ्या व चांगल्या विषयावर मांडणी करण्याची संधी मिळाली. स्पर्धेमुळे अभ्यासपूर्ण वक्ते निर्माण होत आहेत त्यामुळे आम्हाला या स्पर्धेचा जास्त फायदा होत आहे.
– रिद्धी म्हात्रे (तृतीय क्रमांक)
हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. या तोडीच्या स्पर्धा होणे आवश्यक असून यातील वेगळेपण त्याचे महत्व वाढविते. स्पर्धेने आमच्या मनातील विचार मांडायला वाव दिला याचे समाधान वाटते.
– भुवनेश्वरी परशुरामकर (उत्तेजनार्थ पारितोषिक)
स्पर्धेचा अनुभव खूप छान आहे. स्पर्धेचे स्वरुप आव्हानात्मक असल्याने त्यातून शिकायला मिळाले. परिक्षकांची मत, मार्गदर्शक यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. स्पर्धेत बक्षीस मिळाल्याचा आनंद आहे.
– आदित्य जंगले (उत्तेजनार्थ पारितोषिक)