महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून या दोघांकडे तब्बल सात किलो युरोनियम आढळून आलं आहे. युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटीएसने त्यांच्यावर छापा टाकून हे युरेनियम जप्त केला आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटी रुपये इतकी आहे. युरेनियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक आहे. किरणोत्सर्ग करणाऱ्या या धातूचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या युरेनियम बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केलीय. या दोघांकडे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम आढळून आलं आहे. या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. अणु ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
Maharashtra | Two people were arrested in connection with illegal possession of Natural Uranium in Nagpada area of Mumbai, yesterday. Police seized about 7 kg 100 grams of Natural Uranium worth Rs 21.30 crores. Case has been registered under Atomic Energy Act, 1962.
— ANI (@ANI) May 6, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव जिगर पंड्या असं आहे. जिगरकडे चौकशी केली असता त्याला त्याचा मित्र अबु ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
महाराष्ट्र एटीएस पथकाने या दोघांकडे आढळलेला पदार्थ बीएआरसी येथील प्रयोगशाळेमध्ये चाचणीसाठी पाठवला होता. या चाचणीमध्ये हा पदार्थ नैसर्गिक स्वरुपातील आणि शुद्ध युरेनियम असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडील धातू हा युरेनियमच आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेची संपर्क साधला होता. आता दहशतवादीविरोधी पथकाकडून या प्रयोगशाळेचीही तपासणी केली जाणार असून या प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच या दोन्ही आरोपींनी हा घातक पदार्थ आणल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दोघांकडे एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये युरेनियम कुठून आणि कसा आला याचा सध्या शोध घेतला जात आहे.
दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.