नववी-अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा; गुणांचा निर्णय दोन दिवसांत

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे  इयत्ता १०वीची भूगोल आणि कार्यशिक्षण या विषयांची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच इयत्ता ९वी आणि ११वीच्या वार्षिक परीक्षाही रद्द करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी के ली. त्यामुळे या तिन्ही वर्गात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा सुमारे १७ लाख विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांचा २३ मार्चला होणारा भूगोल तसेच कार्यशिक्षणचा पेपर करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. आता या विषयांच्या परीक्षा होणार नाहीत. त्यासह नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांंना पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके आणि अंतर्गत मूल्यमापन करून या पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

इयत्ता ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या मुलांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक संघटनांकडून सातत्याने होत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून हा लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाल्याचे  गायकवाड यांनी सांगितले.

गुणदान कसे करावे याबाबत मंडळाचा निर्णय अजून झालेला नाही. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल. 

-डॉ शकुंतला काळे, राज्य परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष

झाले काय?

दहावीच्या परीक्षेला यंदा १७ लाख विद्यार्थी बसले आहेत. राज्यातील टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे त्यांची भूगोल आणि कार्यशिक्षण या विषयांची राहिलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले. रद्द झालेल्या विषयांचे मुलांना कशाप्रकारे गुण द्यायचे याबाबतचे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहेत.