मुंबईसह महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. आता मुंबईच्या प्रभादेवी परिसरात एका महिलेचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रभादेवी परिसरात कॉर्पोरेट कार्यालयाजवळ या महिलेचा भोजन विक्रीचा व्यवसाय आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या Covid-19 चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे अशी माहिती जी-दक्षिण वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली.

याच भागात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी करोना व्हायरस चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान कलिना येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणीचा रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. इटलीमध्ये तो वेटरचे काम करत होता. विमानतळावरील स्क्रिनिंगमध्ये तो पास झाला आणि कस्तुरबा रुग्णालयातील त्याच्या चाचणीचा रिपोर्टही निगेटीव्ह आला होता.

पण “त्याच्यामध्ये नंतर करोनाची लक्षणे आढळून आली. त्याने स्थानिक डॉक्टरचा सल्ला घेतला व पुन्हा कस्तुरबामध्ये चाचणीसाठी गेला. त्यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला” अशी माहिती माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी दिली.