महाविद्यालयीन कलावंतांना रंगभूमीवर आपला कस जोखून पाहण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला प्रख्यात अभिनेता मनोज वाजपेयी यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन हे मोठे आकर्षण ठरणार आहे.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात प्रवेशासाठी तीन वेळा नाकारले गेल्यानंतरही हिंमत न हरता, कोणीही ‘गॉडफादर’ पाठीशी नसताना रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमांतून केलेली मुशाफिरी.. आपल्या समर्थ अभिनयाने वाजवलेले स्वत:चे खणखणीत नाणे.. इतकेच नव्हे तर, सवरेत्कृष्ट अभिनयासाठी दोन वेळा पटकावलेला राष्ट्रीय पुरस्कार.. हा अभिनेता मनोज वाजपेयी यांचा प्रेरणादायी प्रवास!  त्यामुळेच त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन हे तरुणाईच्या कलाजाणिवा समृद्ध करणारे ठरणार आहे.

उत्साहाने सळसळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईचे व्यासपीठ ठरणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या अनोख्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा मंच सज्ज झाला आहे. सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, नॉलेज पार्टनर ‘एरेना मल्टिमीडिया’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ची नाटय़धुमाळी २४ नोव्हेंबरपासून राज्यभरातील आठ केंद्रांवर सुरू होणार आहे. स्पर्धेच्या नेहमीच्या स्वरूपाप्रमाणे याही वर्षी प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी स्पर्धकांना चुरशीचा सामना करावा लागणार आहे.

या महाअंतिम फेरीत संघर्ष करून स्वत:ला सिद्ध केलेल्या मनोज वाजपेयी यांचा सहभाग प्रेरक ठरणार आहे. बिहारमधील छोटय़ाशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मनोज वाजपेयी यांनी अभिनेता होण्यासाठी बारावीनंतर दिल्ली गाठली. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात प्रवेशासाठी त्यांनी तीन वेळा केलेला अर्ज नाकारण्यात आला. कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना अभिनयावरचे प्रेम त्यांनी जपले. दिल्लीमध्ये त्यांनी नाटय़संस्थांच्या नाटकांतून काम केले. त्यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास ११९४मध्ये ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटाने सुरू झाला. त्या चित्रपटातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या गोविंद निहलानी यांच्या ‘द्रोहकाल’ या चित्रपटातही त्याची अगदी छोटी भूमिका होती. त्यानंतर अनेक चित्रपटांत लहान-मोठय़ा भूमिका करत त्यांचा प्रवास सुरू राहिला. रामगोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे या भूमिकेनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग पुन्हा ‘पिंजर’ चित्रपटातील भूमिकेसाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे प्रकाश झा यांच्यापासून अनुराग कश्यप, हन्सल मेहता, नीरज पांडे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांसमवेत त्यांनी काम केले.‘ गँग्ज ऑफ वासेपूर’मधील सरदार खान, ‘अलीगड’ मधील प्राध्यापक, ‘स्पेशल छब्बीस’मधील पोलीस अधिकारी अशी प्रत्येक भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केली. त्या शिवाय सुरुवातीच्या काळात कलाकार, इम्तिहान अशा टीव्ही मालिकांतूनही काम केले. आजच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा अभिनेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण मनोज वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ते युवा रंगकर्मीशी संवादही साधणार आहेत. त्यामुळे चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवा रंगकर्मीसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी सुरुवातीपासूनच टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून सहभागी असलेले ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर चमकणाऱ्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देणार आहेत.

२४ नोव्हेंबरला पहिली घंटा

मुंबईत २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या विभागीय प्राथमिक फेरीने ‘लोकसत्ता लोकांकिका’चा पडदा उघडणार आहे. त्यानंतर ठाणे (१ आणि २ डिसेंबर), पुणे (१ आणि २ डिसेंबर), नागपूर (२ आणि ३ डिसेंबर), औरंगाबाद (३ आणि ४ डिसेंबर), रत्नागिरी (४ डिसेंबर), नाशिक (७ आणि ८ डिसेंबर) आणि कोल्हापूर (१० आणि ११ डिसेंबर) येथे प्राथमिक फेरी रंगणार आहे. त्यानंतर होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीतून सवरेत्कृष्ट आठ एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडल्या जातील. या एकांकिकांमधून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल.