ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेले रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भाटकर यांचे पूत्र होते. ३ ऑगस्ट १९४९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ यांसारखी अनेक नाटकं गाजली.
१९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांनी त्यांना छोट्या पडद्यावरही प्रसिद्धी मिळवून दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. ही त्यांची अखेरची भूमिका ठरली.
रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.