मार्गावर २१ ठिकाणी मोठे नुकसान;  १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली माथेरान मिनी ट्रेन आता वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसाळ्यात नेरळ ते माथेरान दरम्यान २१ ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार असून त्यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा संपताच पर्यटकांना मिनी ट्रेनचा आनंद लुटता येणार नाही.

जुलै महिन्यात पडलेल्या पावसाळ्यामुळे नेरळ ते माथेरान मार्गावरील २१ ठिकाणी रुळांखालील खडी पूर्णपणे वाहून जाणे, दरड कोसळणे, रुळ सरकणे यासह अन्य मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला अनेक कामे मोठय़ा प्रमाणात हाती घ्यावी लागतील.  प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनि ट्रेन सेवा बंद ठेवली जाते. फक्त अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू असते. परंतु यंदा जुलै महिन्यातील पावसाळ्यात शटल सेवाही बंद ठेवावी लागली होती.

आता या मार्गाचे नेमण्यात आलेल्या एका समितीमार्फत सव्‍‌र्हेक्षण केले जाणार आहे आणि त्यानुसार आलेल्या अहवालानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. रेल्वे बोर्डाकडेही दुरस्तीसाठी लागणारा निधीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.  जानेवारी ते मे २०१६ दरम्यान माथेरान मिनी ट्रेन मार्गावर डबे घसरण्याच्या घटना घडल्या होत्या. घडलेल्या घटनेत डबे दरीत कोसळण्याच्या बेतात होते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मे २०१६ पासून मिनी ट्रेन सेवा दिड वर्ष बंद ठेवली होती. सुरक्षेचे सर्व उपाय केल्यानंतर प्रथम अमन लॉज ते माथेरान शटल सेवा आणि कालांतराने नेरळ ते माथेरान संपूर्ण मिनी ट्रेन सेवा सुरू केली होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये असलेली नाराजी दूर झाली होती. त्याआधीही २६ जुलै २००५ रोजी पडलेल्या मुसळधार पावसातही माथेरान मिनि ट्रेन मार्गावरही मोठी समस्या आल्याने ट्रेन बंद ठेवावी लागली होती. त्यावेळीही साधारण दोन वर्ष ही सेवा पुर्ववत करण्यासाठी लागले होते. आता पुन्हा एकदा माथेरान सेवा वर्षभरासाठी बंद ठेवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.

पावसाळ्यात नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन मार्गावर मोठे नुकसान झाले आहे. यात आम्ही प्रथम नेरळ ते माथेरान दरम्यान असलेली माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू करण्याची शक्यता तपासून पाहत आहोत. त्यासाठी एका समितीकडून सव्‍‌र्हेक्षणही केले जात आहे.     – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे