ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले होते.

याप्रकरणी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.