चांदिवली येथील एका व्यापाऱ्याचा केस प्रत्यारोपणानंतर मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे केस प्रत्यारोपणानंतर घ्याव्या लागणाऱ्या औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांवर चर्चा सुरू झाली आहे.

श्रावणकुमार चौधरी हे गेल्या गुरुवारी चिंचपोकळी येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विकास हलवाई यांच्या दवाखान्यामध्ये केस प्रत्यारोपणाचे उपचार घेत होते. उपचाराची प्रक्रिया दुपारी २.३० पासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रक्रिया संपल्यानंतर काही तासांतच त्यांची मान दुखू लागली. औषधे देऊनही त्रास थांबत नसल्याने डॉ. हलवाई यांनी त्यांना जवळच्या नर्सिग होममध्ये उपचारासाठी नेले. परंतु तेथे भूलतज्ज्ञ नसल्याने त्यांना तात्काळ परेल येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवार सकाळपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. चेहरा आणि घशाजवळ सूज वाढत असल्याने चौधरी यांना तातडीने हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी संध्याकाळी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती एएचआरएसचे डॉ. अनिल कुमार गर्ग यांनी दिली. रुग्णाला भूल दिलेल्या औषधांची अ‍ॅनाफिलॅक्सिस प्रकारची अ‍ॅलर्जी झाल्याचे निदर्शनास येत असल्याचेही डॉ. गर्ग यांनी सांगितले.

चौधरी यांचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे.जे. रुग्णालयाच्या समितीकडे या प्रकरण दाखल केले जाईल. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त एन.डी.रेड्डी यांनी सांगितले. मात्र यामुळे  ‘असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन’ (एएचआरएस) या संस्थेतील जवळपास २०० डॉक्टरांमध्ये शस्त्रक्रियेनंतर घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीवर चर्चा सुरू झाली आहे.

सध्या तरी घटनेचा अपघाती मृत्यू नोंद केली असून तपास सुरू आहे. रुग्णाच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक गावी गेले आहेत. तेथून आल्यानंतर ते कदाचित तक्रार दाखल करतील. दरम्यान चौधरी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. हलवाई यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. यात त्यांनी रुग्णावर ९२५० केस प्रत्यारोपणापैकी ३७०० केसांचे प्रत्यारोपण एका दिवसात केल्याचे म्हटले आहे. रुग्णाने दबाव आणल्याने असे केल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले तरी सत्य परिस्थिती ही नातेवाईकांकडून समजेल, असेही रेड्डी यांनी सांगितले.

प्रक्रिया अशी..

केस प्रत्यारोपणामध्ये मानेच्या मागच्या बाजूचे केस काढून त्यांची सूक्ष्मदुर्बिणीखाली तपासणी केली जाते. यातील योग्य केसांचे तुकडे करून एक एक करत डोक्यावर प्रत्यारोपण केले जाते. प्रत्यारोपणासाठी रुग्णालयानुसार तीन ते दहा लाखांपर्यंत खर्च येतो. भारतात दिवसाला सुमारे १०० लोक केस प्रत्यारोपण करून घेतात.