मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. आज त्या माध्यमांशी बोलत होत्या. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे.”

आणखी वाचा- पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’

त्या पुढे म्हणाल्या, पूर्वी पावसामुळे चार- पाच दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे त्वरीत कारवाई करत आहोत. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.

तर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही माध्यमांशी बोलताना मुंबईच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मुंबईत एका तासात ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सायन आणि चुनाभट्टी रेल्वे रुळावर फक्त पाणी असून इतर ठिकाणी पाणी आलेलं नसल्याची माहिती चहल यांनी दिली आहे. महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच हिंदमाताचं ट्रॅफिक वळवावं लागलं नाही असंही आयुक्त यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- Mumbai Rains: सेंट्रल आणि हार्बर लाईनवरच्या या लोकल रद्द, बेस्टचेही मार्ग वळवले!

मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.