विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केलाय. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या शुशोभिकरणासाठी दिलाय. शिवाजी पार्क हे मुंबईमधील मोजक्या आणि सर्वात मोठ्या मोकळ्या जागेंपैकी एक असून त्याचे आकारमान २२.७ एकर इतके आहे. शिवसेनेचं शिवाजी पार्कसोबत एक खास नातं असून त्याला ऐतिहासिक वारसाही आहे. १९९६ साली याच मैदानावर शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तसेच बाळासाहेबांचे स्मृतीस्थळही शिवाजी पार्कमध्येच आहे. ठाकरे कुटुंबियांच्या जुन्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मैदान आहे. तसेच शिवसेना भवनही या पार्कपासून अगदीच जवळ आहे.
नक्की वाचा >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रध्वजाचा अपमान?; भाषणातील स्क्रीनशॉट झाला व्हायरल
शिवाजी पार्क परिसरामधील स्थानिक राजकारणासंदर्भात बोलायचं झाल्यास या भागामधील शिवसेनेचा प्रभाव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तुलनेने कमी झालाय. मात्र शिवसेनेने आता या भागामध्ये पुन्हा आपला प्रभाव निर्माण केला असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असतानाच मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिलाय हे सुद्धा विशेष आहे.
आमदारांच्या या विकास निधीमधून प्रत्येक आमदाराला त्याच्या स्थानिक परिसरामधील कामांसाठी चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. १९ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू शिवाजीपार्कच्या परिसरातील फुटपाथचा वापर करतात. मात्र या ठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीमध्ये नसून त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा समाना करावा लागतोय. त्यामुळेच मी माझ्या आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि शुशोभीकरणासाठी देत आहे, असं म्हटलं होतं. सामान्यपणे एखाद्या कामासाठी आमदार २५ लाखांपर्यंतचा निधी देऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये विशेष सवलतीअंतर्गत १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिल्यानंतर पाच महिन्यांनी मुंबई माहनगरपालिकेने या कामांसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. सी रामचंद्र चौक ते वीर सावरकर मार्गावरील वसंत देसाई चौकादरम्यानच्या फुटपाथचे शुशोभिकरणासाठी या निवादा मागवण्यात आल्यात. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई आणि इतर रोषणाईची काम केली जाणार आहेत.
शिवाजी पार्कच्या अगदी समोर असलेल्या संयुक्त महाराष्ट्र गॅलरीचंही शुशोभिकरण केलं जाणार आहे. ही गॅलरी उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आलीय. २०१० साली बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या गॅलरीचे लोकार्पण करण्यात आलं होतं. या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंनी काढलेले अनेक फोटो आहेत. या ठिकाणी मिनाताई ठाकरेंचेही स्मारक आहे. या स्मारकाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
ठाकरे यांच्या कार्यालयातील विशेषाधिकारी असणाऱ्या सुधीर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच त्यांच्या आमदारनिधीमधून कोणत्याही प्रकल्पासाठी निधी दिला आहे. जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांच्या देखरेखीखाली हे काम केलं जाणार आहे.