मुख्यमंत्री, महापौर, प्रशासनाला रंगकर्मीचे पत्र
नीलेश अडसूळ, लोकसत्ता
मुंबई : पाच वर्षांतील निष्क्रियतेमुळे ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ला (एनएफडीसी) दिलेला वांद्रे येथील बालनाटय़गृहासाठीचा राखीव भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला असताना हा भूखंड बालरंगभूमीलाच मिळावा यासाठी बालनाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे. गेली कित्येक वर्षे जागेअभावी रखडलेला बालरंगभूमीचा विकास या निमित्ताने मार्गी लागावा यासाठी परिषदेकडून मुख्यमंत्री, महापौर आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे.
बालरंगभूमीच्या विकासासाठी पालिकेने उभारलेली वांद्रे येथील इमारत २०१५ला ‘एनएफडीसी’ला देण्यात आली होती. पाच वर्षांत या संस्थेने इकडची काडी तिकडेही केलेली नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला. ही जागा बालरंगभूमीसाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या बालनाटय़ परिषदेला द्यावी, अशी मागणी परिषदेकडून केली जात आहे. ‘पालिकेने बांधलेली ही वास्तू अनेक वर्षे दुरवस्थेत होती. त्या वेळी मी तिथले कुलूप तोडून जागेची पाहणी केली आणि बालरंगभूमीसाठी ही जागा द्यावी अशी विनंती केली, परंतु पालिकेने जागा एनडीएफसीला दिली. पाच वर्षांनंतरही त्या जागेत बालरंगभूमीसाठी काहीही झालेले नाही,’ असे ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक यांनी सांगितले. ही जागा आता बालनाटय़ परिषदेला द्यावी, यासाठी त्या आठवडाभरात पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची भेट घेणार आहेत.
‘परिषदेच्या राज्यभरात १८ शाखा आहेत. विविध जिल्ह्य़ांमध्ये बालनाटय़ावर अनेक नामवंत संस्था काम करीत आहेत. अशा संस्थांनाही मुंबईत येऊन प्रयोग करायचे असतात. परंतु इथले नाटय़गृहांचे भाडे परवडणारे नसते. संबधित वास्तू बांधून इतकी वर्षे झाली तरीही तिथे बालनाटय़ाची नांदी झाली नाही. पालिकेने परिषदेला जागा हस्तांतरित केल्यास आम्ही तिथे मोलाची कामगिरी करू. महाराष्ट्रातील पहिले बालनाटय़गृह म्हणून याची ओळख होईल. तो बहुमान पालिकेने घ्यावा,’ अशी प्रतिक्रिया बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवर यांनी दिली.
हक्काची जागा हवी
राज्य शासनाने १९८४च्या सुमारास सुधा करमरकर यांना माटुंग्यात भूखंड देऊ केला होता, परंतु इमारत उभारण्यासाठी निधी नसल्याने ती जागा करमरकर यांनी अखिल भारतीय नाटय़ परिषदेला दिली. या जागी उभारण्यात आलेल्या वास्तूत बालनाटय़ासाठीही दालन होणार होते. परंतु कालांतराने परिषदेला त्याचा विसर पडला. आता केवळ भाडय़ात नाममात्र सवलत आहे. त्या वास्तूतून बालरंगभूमी पूर्णत: बाहेर पडली आहे. इतक्या वर्षांत यावर सरकारने कोणतीही भूमिका न घेणे हीच बालरंगभूमीची शोकांतिका आहे. किमान आता तरी पालिकेने बालरंगभूमीच्या हक्काच्या जागेचा विचार करावा अशी व्यथा तुलालवार यांनी मांडली.
‘एनएफडीसी’ची ढिलाई
महापालिकेने वांद्रे येथील ७१२.६३ चौरस मीटरच्या भूखंडावर बालनाटय़गृह उभारून त्या वास्तूचा ताबा २०१५ मध्ये ‘एनएफडीसी’ला वार्षिक शुल्क १ रुपये भाडेआकारणीवर ३० वर्षांसाठी हस्तांतरित केला होता. २०१८ मध्ये या जागेत काहीही न घडल्याचे आमदार अॅड. आशीष शेलार यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. ‘एनएफडीसी’ने पुढाकार न घेतल्याने बालरंगभूमीची जागा धूळ खात उभी असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर पालिकेने ‘एनएफडीसी’शी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु आजतागायत त्या जागेवर बालरंगभूमीसाठी कोणतेही काम केले गेले नाही.
बालनाटकांसाठी मुंबईत हक्काची जागा नाही. पालिकेच्या शाळांनाही हक्काचे व्यासपीठ होईल. त्यांच्यासाठी इथे कार्यशाळा घेऊन नाटक शिकवता येईल. बालरंगभूमीचा विकास साधायचा असेल तर हक्काची जागा आवश्यक आहे.
– मीना नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री