बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण; विभाग स्तरावर कृती आराखडा

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने तयारी सुरू केली आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन पालिके ने मुंबईतील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. तसेच विभाग स्तरावर कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना व झोपडपट्टीमधील रहिवाशांना संसर्गाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमी वर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळाचे उपायुक्त, २४ प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांना कार्यवाही आणि अंमलबजावणीबाबत विशेष निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या सर्व विभागस्तरीय साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने सुरक्षित अंतर राखून आयोजित करावे, कार्यक्रमांचे आयोजन तुकडय़ांमध्ये करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात येणार आहे.